अलिबाग : माणगांव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा उप अभियंता विकास गब्रू जाधव यास तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतची माहिती रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत माणगांव तालुक्यातील तळाशेत ग्रामपंचायत क्षेत्राकरिता नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आनंद कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावे काम मंजूर केले होते. या कामाचे अंदाजपत्रकीय मूल्य ४ कोटी ४१ लाख ६१ हजार २०० रुपये आहे. या कामाचा पहिला हप्ता म्हणून ६० लाख रुपयांचे बिल कंपनीचे उप कंत्राटदार यांच्या नावे निघणार होते. हे बिल मिळण्याबाबत उप कंत्राटदार उप अभियंता विकास गब्रू जाधव यांना भेटण्यास गेले असता जाधव याने त्यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पहिल्या हप्त्याचे ६० लाखांचे बिल मंजूर करणार नाही या भीतीने, उप कंत्राटदाराने जाधवला नाईलाजास्तव ५० हजार रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिली.उर्वरित दोन लाख रुपये लाच जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पुढील बिल मंजूर करणार नाही असा पवित्रा उप अभियंता जाधवने घेतल्यावर उप कंत्राटदारांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी तक्रार दाखल केली. तक्रारीची तत्काळ खातरजमा करुन शुक्रवारीच संध्याकाळी पाच वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यास्मिन ईनामदार यांच्या पथकाने माणगांव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयातच सापळा रचून जाधव याला रंगेहाथ अटक केली आहे. जाधवने स्वीकारलेल्या लाचेचे १ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले असल्याचे कलगुटकर यांनी सांगितले. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
उपअभियंत्याला लाच घेताना पकडले
By admin | Published: April 02, 2016 2:52 AM