देसाई यांच्या मुलींनी दिला पित्याला खांदा; एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 01:07 PM2023-08-05T13:07:42+5:302023-08-05T13:08:49+5:30
देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.
अलिबाग : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या इच्छेनुसार एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारास मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी रायगड पोलिसांनी मानवंदना दिली. नितीन देसाई यांच्या मुली मानसी आणि तन्वी यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला तर मुलगा कांत याने अग्नी दिला.
देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभिनेता आमिर खान, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, मधुर भांडारकर, आशुतोष गोवारीकर व रवी जाधव, अभिनेता सुबोध भावे व आदेश बांदेकर, खा. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, लालबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी, खा. उदयनराजे भोसले, शाहीर नंदेश उमप, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह सिनेकलावंत उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जे. जे. रुग्णालयात देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
इर्शाळगडाची दुर्घटना घडली, त्यावेळी नितीन देसाईंची मदत सर्वात आधी पोहोचली होती. रात्री दीडच्या सुमारास गड चढत असताना आम्ही देसाई यांच्याशी संपर्क साधून टेंटची व्यवस्था होईल का, असे विचारले असता, त्यांनी तातडीने केवळ अर्ध्या तासात टेंट उपलब्ध करून दिले.
- सोमनाथ घार्गे,
पोलिस अधीक्षक, रायगड