खालापूर : शहराचे योग्य नियोजन केल्यास ते सुंदर होते आणि त्या शहरात समस्या कमीकमी होत असतात, मात्र अगदी याउलट परिस्थिती खोपोली शहरात समोर आली आहे. नियोजन सभापतींनी वेगवेगळ्या प्रश्नांवर बैठक बोलावली खरी, मात्र शहराचे मुख्य अभियंते यांनीच अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वीच सभेचा अजेंडा वाचल्याचे जाहीर केल्याने नियोजन करणाऱ्यांनाच बैठकीत केल्या जाणाऱ्या नियोजनाबद्दल माहिती नसल्याने सदस्य तुकाराम साबळे यांनी नियोजनाच्या बैठकीमध्ये निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. अधिकारी माहितीच उपलब्ध करून देत नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करून सभेवर बहिष्कार घातला. या घटनेने पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे . नियोजन सभापती अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे, श्रीकांत पुरी, मोहन औसरमल हे सदस्य उपस्थिक होते, तर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मुख्य अभियंते टी. एन. मांडेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अजेंड्यावर असणाऱ्या एकूण तेरा विषयांवर चर्चा सुरू झाली असतानाच सभेत आक्रमक झालेल्या तुकाराम साबळे यांनी मागील इतिवृत्तापासून सभेपुढील असणाऱ्या विषयांच्या फाइल्स कुठे आहेत, असा प्रश्न करताच यावर मलाच पंधरा मिनिटांपूर्वी अजेंडा माहिती झाल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या साबळे यांनी आपल्या शैलीत मांडेकर यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. श्रीकांत पुरी यांनीही अधिकाऱ्यांच्या निष्काळजी धोरणामुळेच नियोजनात गोंधळ होत असल्याचा आरोप केला. अनधिकृत झोपड्या अधिकृत करणे या विषयावर आक्षेप नोंदवत नगरसेवकांना हा अधिकार आहे का? असा सवाल साबळेंनी उपस्थित केला आहे, तर विकास आराखड्यातील चुका नेमक्या काय आहेत, याची माहिती सभेत विचारली असताना तीही उपलब्ध नसल्याचे समोर आले. शहरात लावलेले बोर्ड किती आहेत, याबाबत ठेकेदार यांना पत्र देऊन विचारणा करणे, तर त्यांच्यासोबत झालेला करार रद्द करण्याच्या विषयावर संबंधित ठेकेदाराला ठेका देण्याची बैठक आरोग्य विभागात करून ठेका देण्यात आल्याने आरोग्य विभागात हा विषय येतो का, याची पडताळणी त्यावेळी का झाली नाही. अशाप्रकारे नियोजन होत नसल्याची भूमिका साबळे यांनी मांडली. (वार्ताहर)संपूर्ण शहराचे नियोजन करण्याची बैठक बोलावली असताना, अजेंडा काढणारे मुख्य अभियंते यांनाच माहीत नसणे गैर आहे. सभेपुढे विषयांच्या एकही फाइल्स माहितीसाठी न आणणे, तर अनधिकृत बांधकामांवर कसलीही कारवाई न करणे अशा निष्काळजी अधिकाऱ्यांकडून शहराचे नियोजन होऊ शकते, नालेसफाईला सुरु वात कधी करणार, आदी प्रश्नांची यावेळी अधिकाऱ्यांना उत्तरेच देता आली नाही. - तुकाराम साबळे, पालिका विरोधी पक्ष नेते, खोपोली सभेचा कोरम पूर्णसभेचा कोरम पूर्ण होता. साबळे यांचा बहिष्कार नसून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न बरोबर असून अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी करूनच सभेला सामोरे जावे. आजची रद्द झालेली सभा पुढील आठवड्यात होणार आहे.- अश्विनी पाटील, सभापती, नियोजन समिती --------नियोजनाची ऐशी तैशी : नियोजन सभापती अश्विनी पाटील यांचा एक वर्षाचा कार्यकाल येत्या जून महिन्यात संपणार असताना संपूर्ण एका वर्षात दोनच बैठका घेण्यात आल्या आहेत. यावरून नियोजन करण्यासाठी अधोरेखित करण्यात आलेली नियोजन समिती शहराच्या नियोजनासाठी किती गंभीर आहे हे समोर आले असताना सभापती यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने नियोजन फसले आहे. तीन सदस्य गैरहजर होते.
खोपोलीच्या नियोजनात अधिकाऱ्यांचाच खोडा
By admin | Published: May 06, 2015 11:26 PM