बंदी असतानाही दिवेआगरमध्ये खवळलेल्या समुद्रात बोटिंग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:30 PM2019-06-17T23:30:17+5:302019-06-17T23:30:36+5:30
२५ मेपर्यंतच होती परवानगी; मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष
- अभय पाटील
बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रात पर्यटकांच्या मौजेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानगीने साहसी खेळ प्रकारातील स्पीड बोटींची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याआधी २५ मेपर्यंतच स्पीड बोट सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाचा आदेश धुडकावून दिवेआगर समुद्रात १५ व १६ जून या सुटीच्या दिवशी खवळलेल्या समुद्रात बोटिंग सुरूच असल्याचे निदर्शनास आले. याकडे मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष होत असून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
दिवेआगर समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून सुटीमध्ये लाखो पर्यटक याठिकाणी येतात. समुद्रकिनारी घोडागाडी, सँड बाइक त्याचप्रमाणे समुद्रामध्ये स्पीड बोट, बनाना बोट व इतर बोटिंग करण्याची मजाही पर्यटक घेत असतात. याठिकाणी पॅरासिलिंग देखील सुरू असते. परंतु मुरुड येथे पॅरासिलिंगमधून पडून झालेल्या दुर्घटननंतर दिवेआगरात पॅरासिलिंग मे महिन्यात बंद केली आले.
समुद्रात होणारे बोटिंगही २५ मेनंतर बंद करण्याचे लेखी आदेश मेरिटाइम बोर्डाने दिले आहेत. मात्र काही बोटमालकांकडून सुटीच्या कालावधीत पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन खवळलेल्या समुद्रात १५ व १६ जून रोजी स्पीड बोट सेवा सुरू ठेवण्यात आली होती. याबाबत बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या सुटीवर असून याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.