कर्जत : प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ म्हणून महत्त्व जपण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करायला लावले. त्यामुळे याठिकाणी वाहनांना बंदी आहे. असे असले तरी सध्या याठिकाणी खासगी वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. रात्री गावातही वाहने येताना दिसतात.माथेरान मॉनिटरिंग कमिटी आणि इको सेन्सेटिव्ह झोन यावर निर्बंध आणणार आहे की नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे. पर्यटकांनाही धुळीचा, धुराचा त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.माथेरान हे वाहनांना बंदी असलेले एकमेव थंड हवेच ठिकाण आहे. तेथे निसर्ग संपदा टिकविण्यासाठी केंद्र सरकारने हा पूर्ण भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठेवला आहे. मात्र मध्य रेल्वेने गतवर्षी मालवाहू वाहने नेवून नियम मोडले. अनेक दिवस वाहनात दगड नेले जात होते. आता पुन्हा एकदा अशीच कामे माथेरानमध्ये सुरु आहेत. रात्री वाहने सर्रास माल घेऊन निर्बंध असलेल्या भागात जात आहेत. माथेरानच्या इंदिरा नगर भागातील रहिवासी वाहनांच्या आवाजाने त्रस्त आहेत. दुसरीकडे माथेरानच्या दस्तुरी नाका वगळता अन्य भागात वाहनांना बंदी आहे. पण अमन लॉज स्थानकाजवळ दररोज मालवाहू वाहने उभी असतात. त्या गाड्यातून आणलेले लोखंडी साहित्य आणि दगडांमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण होत आहे.
माथेरानमध्ये बंदी असूनही वाहनांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 11:30 PM