कांता हाबळे नेरळ : पोशीर गावातील विधवा महिला सुनीता राघो शिंगटे यांचे राहते घर दोन दिवसांपूर्वी कोसळले. अनेक वर्षांपासून घर मोडकळीस आल्याने त्या दुसऱ्याच्या घरात होत्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठ्यामार्फत घराचा पंचनामा करण्यात आला आहे. २०१२ पासून सुनीता शिंगटे या ग्रामपंचायतीकडे घरकूल मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहेत; परंतु ग्रामपंचायतीच्या आडमुठे धोरणामुळे त्यांना अद्याप घरकूल देण्यात आले नाही, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर घरकूल देण्यात यावे, अशी मागणी पोशीरमधील महिला आणि तिच्या अपंग मुलाने केली आहे.पोशीर ग्रामपंचायत अनेक कारणाने चर्चेत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाºयांनी आपल्या जवळच्या व्यक्तीलाच घरकूल दिली आहेत; परंतु ज्यांना खरी घरकूल योजनेच्या लाभाची गरज आहे, ते आजपर्यंत घरकूल योजनेपासून वंचितच राहिले आहेत, त्यातले एक उदाहरण म्हणजेच येथील विधवा महिला सुनीता राघो शिंगटे. त्या अपंग मुलासह राहतात. घरात कोण कमावणारे नसल्याने आणि राहात असलेले घर कोसळल्याने अपंग मुलाला घेऊन त्यांचा दीर महादेव शिंगटे यांच्या जुन्या घरात राहण्यास आल्या आहेत. तेव्हापासून त्या पोशीर ग्रामपंचायतीत घरकूल मिळण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. १० आॅक्टोबर २०१२च्या ग्रामसभेत इंदिरा आवास घरकूल योजनेची प्रतीक्षा यादी सर्वानुमते मंजूर करण्यात आली आणि यात सुनीता राघो शिंगटे यांचे नाव आहे; परंतु आजपर्यंत ग्रामपंचायतीने त्यांना घरकूल मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही.कर्जत तालुक्यात अनेक ग्रामपंचयतींमध्ये असाच प्रकार सुरू असून, ग्रामपंचायतींच्या कारभाराकडे लक्ष देण्यास पंचायत समिती, जिल्हा परिषद, अधिकारी, लोकप्रतिनिधींना वेळ नाही. सुनीता शिंगटे यांचे घर कोसळून दोन दिवस उलटूनही ना या घराची सरपंच, सदस्यांनी पाहणी केली, ना पंचायत समितीच्या सदस्यांनी. पडलेल्या घराचीच पाहणी हे करत नसतील, तर घरकूल मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतील का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
आमच्या घरात मी आणि माझा अपंग मुलगा राहत होतो. घर कोसळण्याच्या स्थितीत होते आणि आमच्याकडे कमावणारा कोणी नसल्याने अपंग मुलाला घेऊन दिराच्या घरात राहत आहे. दोन दिवसांपूर्वी घर कोसळून नुकसान झाले आहे. त्यामुळे घरकूल योजनेतून घर मिळाले, ही अपेक्षा आहे.- सुनीता राघो शिंगटे, महिला, पोशीरसुनीता राघो शिंगटे यांना घरकूल मिळावे यासाठी मी, पोशीर ग्रामपंचायत, पंचायत समिती कर्जत, पंचायत समिती सदस्य यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. घरकूल यादीत नाव असूनही या विधवा महिला आणि अपंग मुलाला राहण्यासाठी घरकूल मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.- मालू शिंगटे, सामाजिक कार्यकर्ते, पोशीर