- सिकंदर अनवारेदासगाव - किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीवर प्राथमिक शाळेमध्ये ८२ विद्यार्थी पटसंख्या असूनदेखील एकच शिक्षक कार्यरत आहे. यामुळे या ठिकाणी अधिक शिक्षकांची मागणी केली जात आहे. शिक्षक न दिल्यास मुलांना महाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयात आणून बसवले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.हिरकणीवाडी ही किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेली वाडी आहे. रायगडवर येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींमुळे या ठिकाणी विविध व्यवसायात येथील ग्रामस्थ गुंतल्याने स्थलांतर कमी प्रमाणात आहे. यामुळे या प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या अधिक आहे. १ ली ते ७ वीपर्यंत याठिकाणी जवळपास ८२ पटसंख्या आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या बदल्यांमुळे येथील शिक्षक अन्य ठिकाणी देण्यात आले. यामुळे या प्राथमिक शाळेत सध्या एकच शिक्षक कार्यरत आहे. एकच महिला शिक्षक असल्याने त्यांचीदेखील दमछाक होत आहे. ज्या शाळांवर पटसंख्या कमी आहे त्याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत आणि किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या शाळेवर पटसंख्या अधिक असूनदेखील शिक्षक दिला जात नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याठिकाणी त्वरित शिक्षक दिला जावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. या बदल्या आॅनलाइन प्रक्रियेद्वारे झाल्या. मात्र, या बदल्या करताना प्रशासनाने पटसंख्या आणि बदली केल्यानंतर निर्माण होणारी स्थिती याबाबत लक्ष देणे गरजेचे होते. यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी हिरकणीवाडीप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत हिरकणीवाडी ग्रामस्थांनी महाड पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात आणि सभापती दत्ताराम फळसकर यांची भेट घेतली. या ठिकाणी शिक्षक देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.पटसंख्या अधिक असल्याने या ठिकाणी शिक्षक असणे आवश्यक आहे. शिक्षकांअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. पूर्णवेळ शिक्षक दिला नाही तर मुलांना शिक्षण विभागाच्या कार्यालयात आणून बसवले जाईल.- प्रेरणा सावंत, सरपंचहिरकणीवाडी येथे एकच शिक्षक शिल्लक राहिला आहे. मात्र, या ठिकाणी त्वरित दुसरा शिक्षक देण्याची व्यवस्था केली जाईल.- अरुणा यादव, गटशिक्षण अधिकारी, महाड
पटसंख्या ८२ असूनही शिक्षक मात्र एकच, ग्रामस्थ संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:04 AM