केमिकल झोन असूनही महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचे पुन्हा वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:46 AM2023-11-04T11:46:09+5:302023-11-04T11:47:12+5:30

कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी, गोंधळ आणि माहिती दडविण्याचे उद्योग

Despite the presence of chemical zones, the safety of the Mahad industrial estate is re-enacted | केमिकल झोन असूनही महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचे पुन्हा वाभाडे

केमिकल झोन असूनही महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचे पुन्हा वाभाडे

सिकंदर अनवारे
लोकमत न्यूज नेटवर्क 
महाड : कारखान्यातील स्फोटाची माहिती समजताच अनेक कामगारांचे नातलग कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. पण कामावर किती जण होते, त्यातील किती बाहेर पडू शकले, किती जणांवर उपचार सुरू आहेत, बाकीचे सर्व सुरक्षित आहेत का, याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे नातलग संतापले होते. घाबरलेल्या काही नातलगांनी रडारड, आक्रोश सुरू केला. सायंकाळपर्यंत ११ जणांचा शोध न लागल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला. 

महाडच्या औद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखाने आहेत. तेथे वारंवार दुर्घटना घडतात. मात्र सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नाहीत. एमआयडीसीचे अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. कंंत्राटी कामगारांना कोणतेही संरक्षण नसते. दुर्घटनेनंतर काही रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जाते. सुरक्षेच्या उपाययोजनाही पुरेशा नाहीत. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारच्या दुर्घटनेनंतरही आले. 

कंपनीचे अधिकारी नीट माहिती देत नसल्याचा त्यांचा आरोप होता. सुरुवातीला ११ कामगारांचा शोध लागला नाही, तरी ते आत अडकले असावेत असाच नातलगांचा समज होता. मात्र नंतरही त्यांच्याबद्दल कोणीच काही सांगत नव्हते. विरल आणि अॅक्वाफर्म या शेजारच्या कारखान्यातील कामगारांनी लगेचच आग विझवण्यासाठी धावपळ सुरू केली. आग लागल्यानंतर सुमारे तासानंतर पोलिस हजर झाले. तोपर्यंत कोणताही सरकारी अधिकारी घटनास्थळी नव्हता. कंपनीकडे आरोग्यपथकही उपलब्ध नव्हते. सायंकाळी चारनंतर प्रशासनातील प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या हलगर्जीवर नातलगांनी संताप व्यक्त केला आहे.

रसायनांची माहितीच नाही!
ज्या कारखान्यात आग लागली, तेथे नेमकी कोणती रसायने होती, याची माहिती कोणालाच नव्हती. रसायनांचे ज्ञान असलेले विशेष पथकही घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे आग विझवताना अडचणी येत होत्या. घातक रसायनांबाबतची माहिती दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप होता.

एनडीआरएफच्या पथकावर भिस्त
बेपत्ता कामगारांच्या शोधासाठी पुण्याहून बोलावलेले एनडीआरएफचे पथक रात्री दाखल होण्याची शक्यता आहे. काऱखान्यात बरीच रसायने असल्याने त्यांची माहिती हे पथक घेईल. त्यासाठी त्यांच्यासोबत रासायनिक तज्ज्ञ असतील. तसेच कंपनीचा काही भाग आग आणि स्फोटानंतर झुकला आहे. तपासकामादरम्यान तो कोसळला, तर मदतीत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे एनडीआरएफचे पथक दाखल झाल्यानंतरच तपासकामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.  

स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात १४ कामगार काम करत होते. जखमींना तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. इतर कामगारांचा शोध सुरू आहे. स्फोटानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
- शैलेश जोशी, कारखाना अभियंता

मल्लक दुर्घटनेची आठवण
९ फेब्रुवारीला महाड एमआयडीसीतील मल्लक कंपनी अशाच आगीत खाक झाली होती. यात १३ कामगार जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता  इतकी भयानक होती की, आठ किमीचा परिसराला हादरला होता. इमारतीचे तुकडे आणि कारखान्यातील लोखंडी तुकडेही दोन किमी अंतरापर्यंत जाऊन पडले होते. पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा हा कारखाना होता.

 

Web Title: Despite the presence of chemical zones, the safety of the Mahad industrial estate is re-enacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.