नागोठणे येथे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त; वनविभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:59 PM2019-05-17T23:59:27+5:302019-05-17T23:59:58+5:30
जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगतचे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले.
नागोठणे : जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगतचे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून वन खात्याने बांधकाम तोडून माझ्यावर अन्यायच केला आहे व त्यांचे विरोधात कुटुंबासह लवकरच उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
येथील नारायण सॉ मिल रस्त्यालगत वन खात्याचा डेपो आहे. येथील वन विभागाचे मुख्य अधिकारी के. डी. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने येथील जागा वेगवेगळ्या मालकांकडून १९६३ मध्ये खरेदी केली होती, त्याचे पैसे मूळ मालकांना दिल्यानंतर १७/३/१९६७ भूसंपादन करणेच्या बाबतचा आदेश, अवॉर्डद्वारे निर्गमित करण्यात आला होता असे स्पष्ट केले. हवाबी गोलंदाज यांचे येथे जुने घर असून त्यांनी याठिकाणी वाढीव बांधकाम केल्याने वन खात्याकडून त्यांना मंगळवार १४ मे रोजी नोटीस पाठवून सदरील सर्वे नं. चे प्रकरण अलिबाग न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने काम थांबविण्याचा सल्ला दिला होता. नोटीस बजावल्यानंतर दोनच दिवसात १६ मे रोजी वनखात्याने फौजफाट्यासह तेथे येऊन बांधकाम तोडल्याने माझ्यावर अन्यायच झाला असल्याचे गोलंदाज यांचे म्हणणे आहे.
वन खात्याची जर ही जागा आहे असे त्यांचे म्हणणे असेल तर, त्यांनी १९६७ साली जागा ताब्यात घेतल्यावर चुकीची सीमा का आखली असा सवाल गोलंदाज यांनी के ला आहे. वन खात्याच्या ताब्यातील जागेचे सर्वे नंबर आजही जुन्या मालकांच्याच नावावर असल्याचे स्पष्ट होत आहे. गोलंदाज यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जुने घर सर्वे नं. ११५/२/ब या जागेत असून वन खाते ही जमीन त्यांच्या मालकीची असे म्हणते, तर त्यांच्या कंपाउंडच्या अनेक फूट पुढे बांधल्याने ही जागा त्यांची नाहीच, असा पुनरुच्चार त्यांनी केला. बांधकाम पाडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे व त्या विरोधात न्याय मागणारच असे त्यांनी स्पष्ट केले. वनाधिकारी ठाकूर यांनी संबंधित जागांचा सर्वे नं. आजही जुन्या व्यक्तींच्या नावावरच असल्याचे सांगितले. मात्र, वन खात्याचे नावावर संबंधित जागेचा सर्वे नंबर होण्यासाठी महसूल कार्यालयाचे लक्ष वेधले असून त्यांच्याकडून सहकार्य केले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.