पाषाणे धरण परिसरात दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:19 AM2018-09-16T04:19:07+5:302018-09-16T04:19:29+5:30
ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरात धाडी टाकून चौघांना जेरबंद केले.
कर्जत : तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या आदिवासीवाडीमधील लोक गावठी दारूचा व्यवसाय करीत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरात धाडी टाकून चौघांना जेरबंद केले. त्यांच्याकडील तब्बल सव्वातीन लाखांचे गावठी दारू बनविण्याचे साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले.
पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत खडकवाडी ही आदिवासी वस्ती असून, ते गाव कर्जत तालुक्याचे आणि पर्यायाने रायगड जिल्ह्याचे शेवटचे गाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, नेरळ पोलिसांनी तीन पथके तयार करून पाषाणे धरण परिसरात धाडी टाकल्या आणि पाषाणे धरण परिसर पिंजून काढत जंगलात चालविल्या जाणाऱ्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
पोलिसांनी खडकवाडीमधील चंद्रकांत सोमा निर्गुडा, अशोक गोमा दरवडा, पांडुरंग भुºया निर्गुडा आणि वसंत बुधाजी आगीवले यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील गावठी दारू बनविण्याचे साहित्य, तसेच गावठी दारूदेखील जप्त करून नष्ट केली. तो भाग जंगलातील असल्याने गावठी दारू बनविण्याचे साहित्य, तसेच २०० लिटर क्षमतेच्या ५९ पिंपांत बनवून ठेवलेले ३८७०० रुपयांचे काळा गूळ मिश्रित नवसागर रसायन नष्ट करण्यात आले. नेरळ पोलिसांनी खडकवाडी येथून पाषाणे धरण परिसरात टाकलेल्या वेगवेगळ्या धाडीत तब्बल तीन लाख ३० हजारांचा माल उद्ध्वस्त केला.