गाढेश्वर, मोरबे धरणावरील बंदोबस्तामुळे पर्यटकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 10:54 PM2019-07-07T22:54:48+5:302019-07-07T22:58:45+5:30
गाढी नदी माथेरानच्या पायथ्यापासून उगम पावली आहे. ती पुढे गाढेश्वर, उमरोली, शांतीवन, नेरे, कोप्रोली, चिपळे, सुकापूर आदी भागातून ती वाहत जाते.
पनवेल : तालुक्यातील गाढेश्वर, माची प्रबळ, मोरबे धरणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी सहलीसाठी येणाऱ्या असंख्य पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यांना आल्या पावली परतावे लागले.
गाढी नदी माथेरानच्या पायथ्यापासून उगम पावली आहे. ती पुढे गाढेश्वर, उमरोली, शांतीवन, नेरे, कोप्रोली, चिपळे, सुकापूर आदी भागातून ती वाहत जाते. हा परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटकांना नेहमीच या ठिकाणचे आकर्षण असते. शनिवारी व रविवारी सकाळपासून परिसरात नागरिकांची झुंबड असते. काहींनी परिसरात फार्म हाउस घेतले आहेत. मुंबई, पुणे या भागातून असंख्य पर्यटक गाढेश्वर परिसरात येतात. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना परत जावे लागत आहे. वाजे फाटा येथे असलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे शेकडो जणांना परत जावे लागले. त्यामुळे पर्यटक नेरे, नेरेपाडा, हरीग्राम, चिपळे आदी परिसरात पाण्यात उतरू लागले आहेत.
गाढी नदीचे पाणी सध्या वाढल्यामुळे पर्यटकांनी पाण्यात न उतरण्याचे आवाहन ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्याला न जुमानता केवळ मौजमजा करण्यासाठी पर्यटक पाण्यात उतरताना दिसत आहेत. गाढेश्वर व मोरबे धरणावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
धरण परिसरात महापालिकेचे सुरक्षा पथक
पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने गाढेश्वर धरण परिसरात सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे. पावसाळ्यात अनेक नागरिक गाढेश्वर धरण परिसरात फिरावयास येतात. अशावेळी काहीजण उत्साहाच्या भरात हुल्लडबाजी करून स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेचे सुरक्षारक्षक नियमित
कार्यरत आहेतच. परंतु पावसाळ्यात पाण्यात उतरून जीव धोक्यात घालणारे नागरिक यांना प्रतिबंधाबरोबर खबरदारी म्हणून जीवरक्षक तैनात केले असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आपत्कालीन
विभागाचे अनिल जाधव व सुरक्षा विभागाचे प्रमुख रमेश पाटील यांनी अचानक भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली.