प्रदूषणाचा विळखा, आरोग्य धोक्यात खाडीपट्ट्यातील रासायनिक सांडपाण्याची गळती थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:45 AM2017-12-11T06:45:29+5:302017-12-11T06:45:40+5:30
महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाल्यापासून गेली ३० वर्षे तालुक्यातील नागरिक विविध प्रदूषणाच्या समस्या भोगत आहेत. यामुळे वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सावित्री खाडीदरम्यान पाइपलाइन टाकण्यात आली आहे.
सिकंदर अनवारे/ लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाल्यापासून गेली ३० वर्षे तालुक्यातील नागरिक विविध प्रदूषणाच्या समस्या भोगत आहेत. यामुळे वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सावित्री खाडीदरम्यान पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या पाइपलाइनमधून वारंवार रासायनिक सांडपाण्याची गळती होत आहे. ही गळती खाडीपट्ट्यातील रहिवाशांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. तरी वारंवार होणाºया गळतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे ३० वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील बिरवाडी कांबळे परिसरातील औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. रासायनिक झोन असलेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रारंभीच्या १० वर्षांच्या काळात सामायिक सांडपाणी प्रक्रिया ही सुविधा नव्हती. यामुळे कारखान्यामध्ये निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी कारखान्याच्या बाहेर नाल्यामध्ये सोडले जात होते. यामुळे महाड शहराला पाणी पुरवठा करणाºया शेडाव डोह, सावित्री, गांधारी, काळ नदी यासह स्थानिक नाले रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले. रसायनांनी रंगीबेरंगी झालेले पाणी नदीच्या पात्रातून महाड शहरात देखील वाहत होते. यावेळी मुठवली आणि सव गावादरम्यान पाइपलाइनद्वारे हे सांडपाणी सोडण्याचा निर्णय सर्व प्रथम झाला तरी देखील प्रदूषणाचा प्रश्न सुटला नाही. २००२ मध्ये सामाईक सांडपाणी केंद्राची उभारणी झाली. पर्यावरण विषयक नियम अधिक कठोर झाले. हे रासायनिक पाणी सावित्री खाडीत सोडण्याचा निर्णय झाला. यासाठी आंबेतपर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली. भौगोलिक अडचणी आणि राजकीय दबावापोटी महाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी आंबेतपर्यंत कधीच गेलेच नाही. तर महाड तालुका हद्दीतील ओवळे या गावाजवळ सावित्री खाडी पात्रात हे पाणी सोडण्यास प्रारंभ झाले. ते आजही ओवळे गाव हद्दीतच सोडले जात आहे.
सावित्री खाडीत पाणी सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या या पाइपलाइनवर ठिकठिकाणी बसवण्यात आलेले एअर व्हॉल्व हे आता सावित्री खाडीकिनाºयावर राहणाºया ग्रामस्थांचे दुखणे बनले आहे. सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर हे सांडपाणी पर्यावरणास घातक नाही असे सामाईक सांडपाणी केंद्राचे अधिकारी सांगतात, असे असले तरी हे पाणी वारंवार पाइपलाइनच्या नादुरुस्तीचे कारण ठरत आहे. सांडपाण्यात शिल्लक राहिलेले रासायनिक घटक आणि सूक्ष्म रासायनिक कचरा कधी पाइपलाइन फुटण्यास तर कधी सांडपाणी एअरव्हॉल्वमधून बाहेर येण्यास कारणीभूत ठरत आहे. गेल्या आठवड्याभरात ४ ते ५ वेळा रासायनिक सांडपाण्याची गळती झाली आहे. कोल, गोठे, तुडील फाटा, जुई, कुंभळे या भागात पाइपलाइनमधून सांडपाणी बाहेर पडून परिसरातील शेती व रस्त्यावर वाहत होते. ही गळती ५ ते ६ तासापेक्षा जास्त काळ होत असल्याने परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनीचे प्रदूषण झाले आहे.
या प्रकरणात महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ केवळ पाइपलाइनची सांडपाणी वाहण्याची जबाबदारी घेत आहे. तर सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामधून बाहेर पडणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी घेत आहे.
वायू आणि जलप्रदूषणाचा
महाड तालुक्याला फटका
महाड औद्योगिक क्षेत्राची निर्मितीपासूनच महाड तालुक्याची बिकटावस्था झाली आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातून खाडीत सोडण्यात येणारे घातक रासायनिक सांडपाणी यापासून त्रस्त झालेल्या खाडीपट्टा तसेच दासगाव परिसरातील जवळपास ३००० हजार हेक्टर जमीन नापीक झाली आहे.
दाभोळपासून ते केंबुर्लीपर्यंत व खाडीपट्ट्यातील गोमेंडीपासून ते सव या गावापर्यंत शेकडो शेतकरी या खाडीतील प्रदूषित पाण्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. तर सध्या खाडी पट्ट्यात ओव्हरफ्लो होणारी ही रसायनाची लाइन यामुळे उरलेली शेतीदेखील या पाण्याच्या लपेट्यात येत आहे. तीही नापीक होण्याचा मागे आहे.
गेल्या ३० वर्षांपासून खाडी पट्ट्यातील शेतकºयांवर या औद्योगिक वसाहतीमुळे वारंवार अन्याय होत आला आहे. या होणाºया नुकसानीची भरपाई कधीच मिळालेली नाही. मात्र अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकºयांना आत्महत्येशिवाय काय पर्याय शिल्लक राहणार नाही.
आंबा पिकाला फटका
औद्योगिक वसाहत येण्यापूर्वी याच महाड तालुक्यातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात आंबा पीक येत असे. मात्र गेल्या २५ वर्षांपासून औद्योगिक क्षेत्राच्या वायू प्रदूषणामुळे या विभागातील आंबा पीक नष्ट झाले आहे. अनेक कुटुंबे आंबा पिकावर अवलंबून असायचे. आज मात्र यांची आंबा बाग ओसाड पडली आहेत. अनेक वेळा कारखान्यांवर जलप्रदूषणाची कारवाई महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येत असते. मात्र वायू प्रदूषणावर अटकाव करता येईल अशा प्रकारची ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. कारखानदारांचा वायू प्रदूषण करण्याचा गोरखधंदा पूर्वीपासून आहे. याचा मात्र फटका महाड तालुक्यातील आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
मच्छीमारी नष्ट
सामाईक सांडपाणी केंद्रातून येणारे घातक रासायनिक सांडपाणी थेट सावित्री खाडीत सोडण्यात येत आहे. जरी या पाण्यावर प्रक्रिया करून सोडण्यात येत असले तरी खाडीच्या पाण्यामध्ये वारंवार बदल दिसून येत असतात. यामुळे सध्याच्या परिस्थितीत खाडीमध्ये प्रदूषण कमी दिसत असले तरी मच्छीसाठी हे खाडीचे पाणी योग्य नसल्याची चर्चा आहे.
दासगावमधील भोई समाज तसेच तालुक्यातील आदिवासी समाजाचा पारंपारिक व्यवसाय मच्छीमारी आहे. मात्र गेली ३० वर्षांपासून सावित्री खाडीत होणाºया जलप्रदूषणामुळे ही सावित्री खाडी मच्छीमारीसाठी संपली असून या दोन्ही समाजातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे. यावर अवलंबून असणाºया अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.
महाड एमआयडीसीतील पाइपलाइन फु टल्याने नुकसान
१मागील आठवड्याच्या सोमवारी पहाटेपासून गोठे आणि तुडील फाट्यावरील एअर व्हॉल्वमधून प्रदूषित पाण्याचे कारंजे उडत होते. या प्रदूषणाची गंभीर दखल घेत ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहत प्रशासनाला पाइपलाइनचे काम करून दिले नाही. याचा परिणाम क ोळ गाव हद्दीत पाइपलाइन फुटली. या सर्वच घटनांचा विचार केला तर सांडपाणी वाहून नेणाºया पाइपलाइनमुळे खाडीपट्ट्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचे थेट परिणाम येथील जनजीवनावर होत आहे. आज खाडीपट्ट्यात अनेक ग्रामस्थ कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त आहेत. सर्दीसारखे आजार सर्वसामान्यांना झाले आहेत.
२दमा, कफ असे श्वसनाचे आजार देखील होत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक आपल्या आजाराचे प्रदर्शन चव्हाट्यावर करत नसल्याने याची नोंद शासकीय दवाखान्यात सापडत नाही तरी खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. खाडीपट्ट्यात होणाºया या प्रदूषणाची आताच योग्य दखल घेतली गेली नाही तर खाडीपट्ट्यात जन्माला येणाºया किंवा मोठे होणाºया भारताच्या भावी पिढीचे आरोग्य धोक्यात आहे. प्रदूषण आणि पर्यावरण या विषयावर तज्ज्ञ म्हणून महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ हे शासकीय मंडळ सर्वच स्तरावर काम करते.
३प्रदूषणकारी कारवायांना नोटिसी बजावणे, हवेचे प्रदूषण रोखणे, नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे ही कामे करीत असताना वारंवार सांडपाण्याची गळती होणाºया खाडी पट्ट्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने खाडीपट्ट्यात प्रदूषणाची दखल घेत महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ अगर महाड उत्पादक संघ संचालित सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
आजाराचे प्रमाण वाढले
महाड औद्योगिक क्षेत्रातून होणाºया वायू तसेच जलप्रदूषणामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्वचेचे रोग, उलटी, जुलाब, घशाचे आजार, श्वसनाचे आजार त्याचप्रमाणे कॅन्सरचा आजार महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
औद्योगिक वसाहतीत निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडून विल्हेवाट लावली जाते. त्याकरिता महाड औद्योगिक वसाहत ते सावित्री खाडी दरम्यान पाइपलाइन ही आमची जबाबदारी आहे. प्रक्रिया केलेल्या रासायनिक सांडपाण्यात गॅसेस का निर्माण होतात. वारंवार ओव्हरफ्लो अगर गळती का होते, ही तांत्रिक बाब आहे. त्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देवून सांडपाण्याची तपासणी करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
- आर. बी. सुळ, उपअभियंता औद्योगिक वसाहत महाड