ठाम निर्धाराने चाकरमानी तरुणांना गवसली भविष्याची वाट; अथक प्रयत्नाने साकारले शेततळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:06 AM2020-07-01T00:06:17+5:302020-07-01T00:06:40+5:30
लहूळसे येथील माळरानावर फु लवणार नंदनवन; शेती करण्याचा निर्णय
प्रकाश कदम
पोलादपूर : लॉकडाऊनमधून काही तरुण मुंबईहून आपल्या गावी आले. मात्र, आता पुढे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. न डगमगता त्यांनी काही अनुभवी, ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला आणि त्यांना त्यांचे भविष्य समजले. या दोन तरुणांनी आपल्या लहूळसे गावात आपल्याच पडीक जमिनीत कृषीच्या योजनांचा वापर करून शेतीचे नंदनवन करण्याचा निधार केले आणि ते कामाला लागले.२२ वर्षांचा तरुण विजय रिंगे आणि त्याला समर्थपणे साथ देणारा योगेश रिंगे या दोन तरुणांनी एकत्र येऊन मागेल त्याला शेततळे या योजनेचा फायदा घेऊन आजोबा-पणजोबांची शंभर वर्ष जुनी शेती जी कधीही वापरात नव्हती, त्या जमिनीत शेततळे केले.या पाण्याच्या जोरावर पुढे दहा एकरावर शेती करण्याचा निणय या तरु णांनी घेतला आहे.
शेती आणि आजची पिढी यांचा संबंध फारच कमी. आज कोणीही शेती करण्यास तयार होत नाही. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे शेतीला तरुणांकडून पसंती दिली जात आहे. तर यात भविष्यही पाहिले जात आहे. यामुळे नक्कीच शेती व्यवसायला नवी उभारी मिळेल. हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली विजय रिंगे आणि योगेश रिंगे या दोन तरुणांना पुढील वाटचालीचा माग मिळाला आहे. शेत तळ्यातील पाण्यावर सुमारे दहा एकर जमिनीमध्ये हळद हरभरा, भुईमूग ही पिके घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांना गावातील धर्मेश रिंगे, भरत रिंगे, बाबू रिंगे आदी शेतकऱ्यांची साथ मिळत आहे. तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक पूनम क्षीरसागर सर्वांचे मार्गदर्शन घेऊन पिवळं सोनं पिकवण्याचा ठाम निर्धार आहे. योगेश रिंगे विजय रिंगे यांसारख्या तरुणांनी लॉकडाऊनमध्ये हातावर हात ठेवून गप्प न बसता, मोठ्या प्रयत्नाने साहित्याची जमवाजमव करून शेततळे उभे केले.कोकणातील साºया तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. वेळेचा सदुपयोग कसा करायचा, त्यातून गावातील तरुण कसा फायदा घेता येईल, याचा एक आदर्श पाठ या तरुणांनी घालून दिला आहे.
शंभर वर्षांत जे जमलं नाही, ते एका महिन्यात झाले
लहूळसे गाव हे महाबळेश्वरच्या पायथ्याशी सावित्री नदीच्या उगम स्थानी पोलादपूर तालुक्यातील प्रथम गाव. उन्हाळ्यात या गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत असतो, तरीही काही तरुणांनी एकत्र येऊन हा शाश्वत शेतीचा उपक्रम हाती घेतला आहे. देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सेंद्रिय शेती गट अगोदरच अस्तित्वात आहे, त्याचाही फायदा मिळणार आहे. गेली १०० वर्षे पडीक असणारी शेतीही यंदापासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे माळरान हिरवेगार झाले असून, या तरु णांनी जवळपास एका महिन्यातच हे काम करून दाखवलं.