रेवदंडा : कुंडलिका खाडी ज्या ठिकाणी संपते त्यापुढे खोल समुद्र सुरू होतो. त्या मार्गावर रेवदंडा गावाच्या समोरील भागात गुरु वार २०फे ब्रुवारीलापहाटे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना ‘देवमुशी’ (बहिरी) तर इंग्रजीत व्हेल शार्क नावाने ओळख असलेला मासा मिळाला.
जेजुरी नावाच्या नौकेवर मनोहर साळावकर (रा. साळाव नाका, ता. मुरूड-जंजिरा) हे व अविनाश सारंग व सुनील खेदू (दोघेही रा. थेरोंडा, ता. अलिबाग) हे खोल समुद्रात गुरु वारी पहाटे मच्छीमारी करण्यासाठी नौकेतून गेले असता रेवदंडा गावाच्या समोरील भागात त्यांना लावलेल्या जाळ्यात हा मासा सापडला. जाळे जड लागल्यावर साळावकर यांच्या हे लक्षात आले. परंतु उजाडले नसल्याने अंधारात त्यांच्या नियमाने नौका रेवदंडा जेटीवर आणली तेव्हा साधारण ९.३० वाजले होते. मासा सुमारे २० फूट लांब व १५०० किलो वजनाचा असल्याने त्याला जिवंत सोडण्याचा निर्णय या मच्छीमारांनी घेतला. खाडीत नौका पाण्यात घेऊन जाळे व्यवस्थित सोडवून त्या माशाला खोल समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.या माशाला पकडणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई होऊ शकते, अशी माहिती मस्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हा मासा उपासमारीने या किनारी आला असावा असे जाणकारांचे मत आहे.