विकास व्हावा; मात्र पर्यावरणाचा बळी नको- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:24 AM2020-01-05T01:24:26+5:302020-01-05T01:24:32+5:30
विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले.
माणगाव : विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले. वडघर येथील राष्ट्रीय स्मारक येथे आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. पर्यावरणाच्या -हासामुळे आज आपण अनेक संकटांना तोंड देत आहोत. ही संकटे कशामुळे येतात, यासाठी पर्यावरणावर काम करण्याची गरज आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यामुळे पर्यावरणाचा नाश होऊ नये यांची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी असल्याचे विचार सुळे यांनी मांडले. महाराष्ट्रात आलेले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असून, पाच वर्षांत विकासाच्या नावे फरफट होणार नाही, याची काळजी घेणारे सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्यमंत्री आदिती तटकरे, उपसभापती राजेश पानावकर, स्मारक अध्यक्ष कवयित्री नीरजा, माजी अध्यक्ष युवराज मोहिते, उल्का महाजन, कुरैटर राजू सुतार आदी उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये साकारलेल्या कलाकृतींवर बोलताना सुळे म्हणाल्या, चित्रामध्ये कलाकारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इंदापूर ते आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असा आर्टिस्ट कॉरिडोर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.