मुरुड शहराचा विकास करणार, रेल्वेचे जाळे जिल्ह्यात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 05:01 AM2018-11-11T05:01:48+5:302018-11-11T05:02:30+5:30
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे प्रतिपादन : स्वच्छता व चेंजिंग रूमचे उद्घाटन
आगरदांडा : मुरुड शहराच्या टप्प्याटप्प्याने विकासाला प्राधान्य देणार आहोत. मुरुडला पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यासाठी चेंजिंग रूम व स्वच्छतागृह खूप आवश्यक होते. रायगड जिल्हा हा पर्यटकांना आवडणारा जिल्हा असून, येत्या काळात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरवणार आहे. लवकरच इलेक्ट्रिक रेल्वेद्वारे पनवेल-पेण, पेण-रोहा व अलिबागपर्यंत रेल्वेच्या फेऱ्या सुरू होणार असल्याचे शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते यांनी मुरुड येथे सांगितले. केंद्रीय मंत्री गीते यांच्या प्रयत्नामुळे सिमलेस कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून ३५ लाखांच्या निधीद्वारे मुरुड समुद्रकिनारी स्वच्छतागृह व चेंजिंग रूमचे उद्घाटन गीते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
गीते म्हणाले, पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जेट्टी मंजूर असून, कामाचे टेंडरसुद्धा निघाले आहे. मुरुड शहरातील विविध कामांसाठी या वेळी मी माझ्या खासदार निधीमधून २१ लाखांचा निधी वितरित केला असून, लवकरच या कामाचे भूमिपूजनसुद्धा होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील काशीद, नागाव आक्षी, कुरुळ, किहीम समुद्रकिनारी येत्या काळात स्वच्छतागृह व चेंजिंग रूम बांधण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांना आवश्यक असणाºया सुविधा दिल्या तर पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांच्या रोजगारात भर पडणार आहे. यासाठी मूलभूत सुविधा देण्यावर आपला प्रयत्न असेल, असेही ते ेम्हणाले.