- सिकंदर अनवारेदासगाव : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी कोकणातील धनगर समाजाच्या विकासाची वणवण आजही संपलेली नाही. कोकणात शिवकालांमध्ये हा समाज स्थिरावला, डोंगरकपारींमध्ये वाड्या-वस्त्यांमधून राहू लागला, अत्यंत हालाखित दिवस काढणाऱ्या या समाजाच्या विकासाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गावे डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली असल्याने काही गावांचा विकास झाला; परंतु अनेक गावे विकासापासून आजही वंचित राहिलेली आहेत. सध्या मूलभूत सुविधाही येथे उपलब्ध नाहीत.गावापासून काही अंतरावर आपले वेगळेपण जपत धनगरवाड्याही आपले अस्तित्व राखून आहेत. कडेकपारीमध्ये राहत असलेला धनगर समाज विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिला आहे. डोंगराच्या कड्याच्या कपारींत पिढ्यान्पिढ्या राहत असलेल्या धनगरवाडीवर जाण्यासाठी साधा रस्ता नाही, आरोग्य सुविधा नाही, पाणी नाही, विजेची सोय नाही, यासारख्या अनेक समस्या आहेत.पाण्याची गरज भागविण्यासाठी डोगरांतून येणाऱ्या पाण्याच्या झºयावर अवलंबून राहावे लागते. उन्हाळ्यात डोंगरातील पाण्याचे स्रोत शोधावे लागतात. डबकी तयार करून पाण्याची गरज भागवावी लागत असल्याचे धनगर समाजाचे नेते संजय कचरे यांनी सांगितले. याचबरोबर वाडीतील मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये असंख्य धनगरवाड्या आहेत, बहुतेक वाड्यांवर जाण्यासाठी रस्ते नसल्याने पायपीट करावी लागते. या जिल्ह्यातील प्रत्येक धनगरवाडीला भेट देऊन त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेत शासनाला कळविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून आपण करीत असल्याचे संजय कचरे म्हणाले. शासनाकडून जर विकासाची कामे होत नसतील, तर सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून किल्ले रायगड परिसरांमध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत, त्या पद्धतीने या धनगरवाड्यांचा विकास करावा, असे मत धनगर समाजाचे गाढे अभ्यासक अशोक जंगले आणि संजय कचरे यांनी व्यक्त के ले.>शिक्षणामुळेच गावांचा विकास शक्यमहाड तालुक्यातील बहुतांशी धनगरवाड्या जरी डोंगराच्या पायथ्याशी असल्या तरी गावापासून फार दूर नाहीत. या वाड्यांचा विकास साध्य करण्यासाठी तेथील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यातील ज्या गावाजवळ धनगरवाडी आहे, त्या गावांमध्ये सर्वप्रथम शाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले, असे कचरे यांनी सांगितले.महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यांमध्ये एकूण ४२ शाळा उभारण्यात अशोक जंगले यांचे मोलाचे योगदान आहे. यामध्ये तालुक्यातील चिंभावे, वाघोली, गाढव खडक, नेवाळी, चाचखोडा, वळई, आमडोशी आदी धनगरवाड्यांचा समावेश आहे. शाळा इमारती उभारण्यासाठी मुंबईतील सेवाभावी एम्पथी संस्थेने सहकार्य केले असल्याचे कचरे यांनी सांगितले. माणगाव तालुक्यातील पहिली धनगरवाडी सुमारे दोन हजार फूट उंचावर आहे. या वाडीतील बाया झोरे ही महिला संरपंच झाली आहे. महाड तालुक्यातील आमडोशी येथील समाजाची व्यक्ती सरपंचपदावर निवडून आली आहे. हे सर्व शिक्षण आणि प्रबोधनामुळे शक्य झाले.>रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबवण्याची मागणीज्या धनगरवाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या वाड्यातून रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविली तर पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो, महाड तालुक्यातील चाचखोडा धनगरवाडीमध्ये ही योजना राबविण्यात यावी, अशी मागणी के ल्याचे संजय कचरे यांनी सांगितले. रोहा तालुक्यातील हेदाई धनगरवाडीही विकासापासून वंचित राहिली आहे. आज या वाडीमध्ये वीज, पाणी आरोग्य या मूलभूत सुविधा नाहीत, सुधागड, पाली तालुक्यांतील बारसबोडग या धनगरवाडीवर जाण्यासाठी नऊ कि.मी पायपीट करावी लागते.मागील वर्षी तरुणांनी श्रमदानातून रस्ता केला; परंतु पावसाळ्यामध्ये रस्त्याचा उपयोग केला जात नाही. कोकणातील धनगरवाड्यांची थोड्या फरकाने सारख्याच समस्या आहे. आजही वाड्या विकासापासून वंचित आहेत. समाजाचा वापर केवळ निवडणुकात होत असल्याचे खंत व्यक्त होत आहे.
धनगरवाड्यांचा विकास कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:33 PM