- जयंत धुळपअलिबाग : जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९४ टक्के निधीचा विनियोग करून रायगड जिल्ह्याने कोकणात आघाडी घेतली आहे, तर शिल्लक ६ टक्के निधी मार्च महिनाअखेर खर्ची पडणार आहे. जिल्ह्यास मिळालेल्या निधीपैकी एकही पैसा राज्य सरकारकडे परत जाणार नाही. गेल्या दोन वर्षात जिल्ह्याने ९९ टक्के विकास निधी खर्च केला आहे.लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याने, जिल्हा विकास आराखड्यांची कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. परिणामी नियोजन विभागाने सर्व विभागांच्या कामांना मंजुरी देऊ न निधी वितरित केला होता. हा निधी मार्चअखेर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याने ९९ टक्के विकास निधी खर्च केला होता. त्यामुळे यंदाही विकास निधी खर्ची पडेल यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने प्रयत्न केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत. पतन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, पशुसंवर्धन विभागांचा अपवाद सोडला तर बहुतांश सर्व विभागांनी आपला विकास निधी खर्च केला आहे. अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी ५३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी शंभर टक्के खर्च झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे.१४० कोटींचा निधी १५ मार्चअखेर खर्चजिल्हा नियोजन आराखड्यानुसार, गाभा क्षेत्रातील १४९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४० कोटींचा निधी १५ मार्चअखेर खर्च झाला. हे प्रमाण ९४ टक्के आहे. तर बिगर गाभा क्षेत्रातील ३९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील ३२ कोटींचा निधी खर्च झाला आहे. हे प्रमाण ७८ टक्के आहे.ज्या विभागांनी आपल्याकडील विकास निधी खर्च केला नाही त्या सर्व विभागांनी मार्चअखेर निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलाही विकास निधी समर्पित होणार नाही या पद्धतीने नियोजन करण्याची सक्त सूचना खातेप्रमुखांना देण्यात आली आहे.
विकास निधी खर्च करण्यात आघाडी; जिल्ह्यातील ९४ टक्के निधी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:24 AM