'कोकणचा विकास हवा असेल तर पक्षभेद विसरा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:46 PM2019-01-28T23:46:36+5:302019-01-28T23:47:45+5:30

‘कोकण आज आणि उद्या’ परिसंवाद; प्रमुख राजकीय नेत्यांचे एकमत

'For the development of Konkan, forget the differences' | 'कोकणचा विकास हवा असेल तर पक्षभेद विसरा'

'कोकणचा विकास हवा असेल तर पक्षभेद विसरा'

Next

अलिबाग : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया आजतागायत होऊ शकला नाही. परिणामी सर्वपक्षीयांनी राजकारण विसरून विकासाच्या मुद्यावर एकत्र यायला हवे असा विविध राजकीय पक्षांच्या नेत्याचा एक सूर गुरुवारी संध्याकाळी ‘कोकण आज आणि उद्या’ या परिसंवादात ऐकायला मिळाला. लायन्स अलिबाग फेस्टिव्हल मध्ये ‘कोकण आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते, भाजपा नेते मधू चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील सहभागी झाले होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. परिसवांदात काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई उपस्थित राहाणार होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत.

शेजारच्या गोवा राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था समुद्र आणि त्यावर आधारित पर्यटनावर आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात रासायनिक प्रकल्प आणण्याऐवजी पर्यटनपूरक उद्योग आणणे गरजे असल्याचे एकमत सर्वपक्षीय नेत्यांचे झाले. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा कित्येक वर्षे कोकणवासीय ऐकत आहेत. मात्र कोकणवासीयांना हवा असलेला विकास कधी झाला नाही. यास काही प्रमाणात राजकीय नेतृत्वांचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत ठरला असल्याचे यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी लावला.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होवून तो कोकणवासीयांच्या सेवेत नेमका कधी रुजू होणार अशा प्रश्न गाडगीळ यांनी विचारल्यावर बहुतेक सर्व पक्षप्रतिनिधींनी गोवा महामार्गाच्या कामाच्या विलंबास प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचे नमूद केले. पर्यावरण विभाग आणि भूसंपादन यांच्या अडचणी त्यास कारणीभूत ठरल्या आहेत. आजही पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही असे मत दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. रस्त्यावर होणाºया वाहतुकीची क्षमता लक्षात घेऊ न कोकणातील रस्ते विकसित व्हायला पाहिजेत असा मुद्दा आ.जयंत पाटील यांनी मांडला. मधू चव्हाण यांनी रस्त्यासाठी तोडण्यात आलेली झाडे पुन्हा लावली गेली पाहिजेत अशी भूमिका मांडली. कंत्राटदाराचे अपयश हे देखील महामार्गाचे काम रखडण्यामागचे कारण असल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण गरजेचे
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण गरजेचे आहे. दुपदरीकरण झाले तर कोकणातील लोकांना रेल्वेचा अधिक फायदा मिळू शकेल. डेक्कन ओडीसी सारख्या पर्यटन गाड्या अधिक प्रमाणात सुरू करता येतील अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली. सुरेश प्रभू यांचे रेल्वे मंत्रीपद गेल्याने कोकण रेल्वेच्या विकासाला खीळ बसली, ते अजून काही काळ रेल्वे मंत्री असते तर कोकण रेल्वेचे सर्व प्रश्न मार्गी लावले असते, अशी भूमिका दिवाकर रावते यांनी मांडलीे. कोकणातील समुद्र संरक्षक खारबंदिस्ती फुटून शेतकºयांच्या शेतजमिनींचे नुकसान झाले आहे, त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यास दिली असल्याचे रावते यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

कोकणातच सर्वाधिक उत्तरदायित्व निधी
राज्याच्या कोणत्याही महसूल विभागात नाहीत इतके कारखाने एकट्या कोकणात आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्वाधिक सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) निर्माण होतो. मात्र हा निधी कोकणातील विकासात वापरला जात नसल्याच्या मुद्यावर तटकरे यांनी सहमती दर्शवून हा निधी कोकणातच वापरला जावा याकरिता कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे नमुद केले. या बरोबरच कोकणातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सीआरझेड, जलप्रवासी वाहतूक यासारख्या विविध कळीच्या मुद्द्यावर राजकारण विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे मतही अखेरीस सर्वांनीच व्यक्त केले.

 

Web Title: 'For the development of Konkan, forget the differences'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.