जनतेचा विकास हाच माझा ध्यास- सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:24 AM2019-05-27T00:24:08+5:302019-05-27T00:24:24+5:30
रायगडच्या मातीने सदैव आपली अस्मिता अबाधित ठेवत नावीन्याचा स्वीकार करून निरंतर लढा दिला आहे.
श्रीवर्धन : रायगडच्या मातीने सदैव आपली अस्मिता अबाधित ठेवत नावीन्याचा स्वीकार करून निरंतर लढा दिला आहे. देशात कमळाची त्सुनामी असताना श्रीवर्धनच्या समुद्रातील लाटांनी माझा संसद भवनापर्यंतचा रस्ता निर्माण केला. श्रीवर्धनच्या जनतेचा विकास हाच माझा ध्यास असेल असे सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी मिरवणुकीची सांगता शिवाजी चौकात झाली, त्या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
मी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव प्राधान्य दिले व देत आहे. आज त्याचे फलित म्हणून मला श्रीवर्धन मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास आगामी काळात निर्विवादपणे सिद्ध करून रायगडच्या मातीची अस्मिता संसदेत उमटल्याशिवाय राहणार नाही. मी आजन्म साधा कार्यकर्ता आहे व भविष्यातसुद्धा साधा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन. यशाची हवा आजपर्यंत कदापि माझ्या डोक्यात गेली नाही व आगामी काळातसुद्धा यशाने मी हुरुळून जाणार नाही असे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.
श्रीवर्धन तालुक्याला विकासकामासाठी कधीच निधीची कमतरता भासू दिली नाही. आता खासदार निधीतून श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांना चालना देण्याचे माझे दायित्व आहे. माझा राजकीय प्रवास बॅ. अंतुले यांच्याशी मिळते जुळते आहे. अंतुले याचा राजकीय वसा मला प्राप्त झाला आहे. राजकारणाच्या माध्यमातून कोकणचा विकास साधण्याची किमया मी करून दाखवणार आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. या मिरवणूक सांगतेच्या प्रसंगी अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धनमधील जनतेचे आभार मानले, ही विजयी मिरवणूक श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वार ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, नरेंद्र भुसाने, दर्शन विचारे, गणेश पोलेकर, राजेंद्र भोसले, मोतीराम परभळकर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.