- मुकुंद रांजणे
माथेरान : माथेरानचा संपूर्ण परिसर हा बिनशेतीचा असल्याने सर्वांनाच केवळ पर्यटन शेतीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळेच येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जात असून, बहुतांश विकासकामेसुद्धा प्रगतिपथावर आहेत. हेरिटेज वास्तूंना संरक्षण आणि त्यांचे जतन करताना पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची बाधा, झळ पोहोचणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यातच ब्रिटिशकालीन वास्तू यामध्ये कपाडिया मार्केट असो अथवा नगरपरिषदेच्या आवारातील भूभाग, यांच्या स्वच्छतेकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.सार्वजनिक वाचनालयाची नव्याने किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे प्रगतिपथावर असून, हा एकंदरीत परिसरसुद्धा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाचनालय भागात लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इथे आपसूकच पर्यटकांना क्षणभर विश्रांतीसह खरेदीसाठी या मार्केटमध्ये गर्दी होऊ शकते. यातूनच इथल्या व्यावसायिक वर्गाला चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन प्राप्त होण्याची शक्यता आहे.माथेरानमध्ये शासनाकडून आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील रक्कम ही केवळ हेरिटेज इमारतीच्या संरक्षण आणि विशेषतः एकप्रकारे सुरक्षा कवच असावे यासाठी खर्च करण्याची तजवीज असल्याने ज्या ज्या हेरिटेज वास्तू आहेत, त्यामध्ये नगरपरिषद कंपाउंड, वाचनालय, नगरपरिषद प्राथमिक शाळा अशा ठिकाणी या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील रकमेचा सदुपयोग करण्यात आला आहे. ही कामे पूर्ण करताना या हेरिटेज वास्तूंच्या सौंदर्याला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेऊन कामे पूर्ण करण्यात येत आहेत. सर्व संरक्षण भिंती या जांभ्या दगडात बांधण्यात आलेल्या असून, अंतर्गत भागात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वास्तूच्या अंतर्गत भागातील मातीची धूपसुद्धा यामुळे थांबणार आहे.
हेरिटेज वास्तूला नवे रूप देण्याचा प्रयत्न मुख्य बाजारपेठ ठिकाणी शतकी पार केलेल्या कपाडिया मार्केटची दुरुस्ती करताना या हेरिटेज वास्तूला नवे रूप देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. कपाडिया मार्केट या मुख्य बाजारपेठेतील भग्नावस्थेत पडलेले मोडके दगडी गाळे पुन्हा बांधण्यात आले. गंजलेले व गळके पत्रे बदलून नव्याने बसविण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या भागाची पाहणी करून उत्तम दर्जाची कामे व्हावीत यासाठी ठेकेदारांना, नगरपरिषदेच्या अभियंत्यांना वेळोवेळी सूचना करीत आहेत.
मुख्यत्वे माथेरानला धुळीचा त्रास पर्यटकांना तसेच व्यापारी वर्गाला सहन करावा लागत आहे. लवकरच दस्तुरीपासून ते पांडे रोड हा जवळपास चार किलोमीटरचा मुख्य रस्ता क्ले पेव्हर ब्लॉकने बनविण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात धुळीचे प्रमाण नगण्य असणार आहे. -डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी,न.प
माथेरान पर्यटनावर अवलंबून असल्याने पर्यटक वाढले तरच इथल्या नागरिकांना व्यवसाय प्राप्त होऊ शकतो. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न असून, इथल्या विकासकामांसाठी शासनाकडून भरीव निधी प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा