खोरा बंदरातील विकासकामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 03:06 AM2019-11-25T03:06:12+5:302019-11-25T03:06:36+5:30
सन २०१८ रोजी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदराच्या विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून या बंदरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली होती.
- संजय करडे
मुरुड : सन २०१८ रोजी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदराच्या विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून या बंदरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली होती. कामाबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खोरा बंदरातील संरक्षक भिंत बांधणे, समुद्र किनाऱ्याभोवती दगडी आवरण करणे, बंदरातील गाळ काढणे, मुख्य बंदरावर पेव्हर ब्लॉक बसविणे, स्वछतागृह व प्रतीक्षालय इमारत आदी स्वरूपाची बांधकामे येथे पूर्ण करण्यात आली. ही सर्व कामे करत असताना खोरा बंदरातील वाहनतळाचे काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. त्याचप्रमाणे या बंदरावर विजेचे खांब नवीन बसविण्यात येणार होते, तेसुद्धा बसविण्यात आलेले नाही. पर्यटकांना बसण्यासाठी काँक्रीटच्या खुर्च्या बसविण्यात येणार होत्या, परंतु तेसुद्धा काम पूर्ण न करता संबंधित ठेकेदाराला बिल अदा केल्याने रखडलेली कामे पूर्ण होणार की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून कोट्यवधी रुपयांच्या बंदर विकासाची कामे केली जातात, परंतु ती पूर्ण न होता ठेकेदाराला बिल अदा करण्याची पद्धत बळावत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मेरीटाइम बोर्डाचे संपूर्ण कोकणासाठी कार्यकारी अभियंता हे एकमेव पद असून, कोकणातील सुरू असलेल्या या कामांवर एकच माणूस लक्ष देत असल्याने, ज्यावेळी प्रत्यक्ष काम सुरू असते, त्यावेळी या ठिकाणी कोणताही अभियंता उपस्थित नसतो. ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करतो. तद्नंतर ते काम पाहावयास कार्यकारी अभियंता येतात व बिल काढण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा या प्रक्रियेमुळे असंख्य कामे प्रलंबित राहिल्याने ठेकेदाराविषयी स्थांनिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुरुड येथील खोरा बंदरातील वाहनतळाचे काम राखडल्यामुळे पर्यटकांच्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पावसाळा संपला तरी मुहूर्त नाही
१याबाबत काही दिवसापूर्वी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी खोरा बंदरातील वाहनतळ व रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता, पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे जिरले, तर काँक्रीट चांगल्या पद्धतीने होऊन ते चिरकाल टिकते.
२पावसाळा संपताच तातडीने वाहन तळाचे काम सुरू करू अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती, परंतु आज पावसाळा संपून दोन महिने झाले, तरी खोरा बंदरातील वाहनतळाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
३याबाबत पुन्हा विचारणा के ली असता लवरकरच काम सुरू होईल असे ते म्हणाले. मात्र,डिसेंबर महिन्यात नाताळाच्या सुट्ट्या असल्याने असंख्य पर्यटक या ठिकाणी येणार आहेत. अशातच वाहनतळाचे काम पूर्ण न झाल्याने पर्यटकांना रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या कराव्या लागणार आहेत.
४त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूककोंडी होणार आहे, परंतु या परिस्थितीकडे कार्यकारी अभियंता देवरे हे गांभीर्यपूर्वक घेत नसल्याने, सदरील वाहनतळाचे काम खूप महिन्यांपासून आहे त्या स्थितीत आहे.