प्री वॉटर कप स्पर्धेत देवळे गाव अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:01 AM2018-08-18T03:01:01+5:302018-08-18T03:01:27+5:30
पोलादपूर तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली.
पोलादपूर - तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्यातील देवळे गावाची प्रथम क्र मांकासाठी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी देवळे ग्रामस्थांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते.
प्री वॉटर कप स्पर्धेतील दुसरा क्र मांक आडवले खुर्द, तर तृतीय क्र मांक कापडे गावाने पटकाविला. पोलादपूर तालुक्यातील देवळे, आडावळे खुर्द, साळवी कोंड, गोवले, खांडज, बोरघर, वडघर बुद्रुक, कामथे, सडवली, काटेतळी, कापडे बुद्रुक, बोरावळे आणि ताम्हाणे या १४ गावांमध्ये प्री वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यानंतर श्रमदानास सुरुवात झाली होती. सकाळी आणि संध्याकाळी ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदान करत होते. स्पर्धा १० एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये राबविण्यात आल्याने गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांची श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आली. १४ स्पर्धक गावांमध्ये श्रमदानामधून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे करण्यात येणार असून मुंबई, सुरत व पुणेकर ग्रामस्थांच्या सहभागामुळे स्पर्धेसाठी सर्वच गावांमध्ये चुरस निर्माण झाली होती.
जल्लोष आमच्या गावाचा... देवळे ग्रामस्थ एकजुटीचा
जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘प्री वॉटर कप ’ने यंदा पोलादपूरसारख्या डोंगरी दुर्गम भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदान केले. सरकारवर अवलंबून न राहता पाणी अडवण्याचा, जिरवण्याचा, वाचवण्याचा आणि जबाबदारीने वापरण्याचा वसा घेऊन कामाला भिडलेल्या या गावांनी जबरदस्त लढत दिली.