शिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी, शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:58 AM2020-02-22T00:58:50+5:302020-02-22T00:59:02+5:30
शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले
महाड : महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. शुक्रवारी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. गुरु वारपासून वीरेश्वर छबिना उत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवारी महाशिवरात्रीला महाडची ग्रामदेवता जाखमातादेवी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे वीरेश्वराच्या भेटीला वाजतगाजत मिरवणुकीने आली.
शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले
आगरदांडा : मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील शिवमंदिरात व टेकडीवर असणाऱ्या क्षेत्रपाल मंदिरात ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजरात शिवभक्तांनी आपल्या आराध्य दैवतेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी
के लीहोती. शिवपिंडीवर भक्तांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.
बोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील प्राचीन पांडवकालीन असलेल्या काशिद ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे येथील कावड्याच्या डोंगरावर वसलेल्या सर्वेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली. तहसीलदार गमन गावित यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिवपिंडीचे दर्शन घेतले. सकाळी शिवपिंडीची विधिवत पूजा-अर्चा, आरती करण्यात आली. यानिमित्ताने श्री शिवलीलामृत ग्रंथवाचन, भाविकांसाठी सुश्राव्य बहारदार भजन आदी कार्यक्रम पार पडले.
कर्जत : महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बहुतांश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ९ वाजेपर्यंत कर्जतकरांनी पालखीतील कपालेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात ह. भ. प. श्रीराम पुरोहित यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पुणे येथील महादेव तुपे बंधू यांचे सनईवादन, श्री कपालेश्वराची महापूजा करण्यात आली. लघुरुद्र अभिषेक त्यानंतर सामूहिक शिवलीलामृत पारायण झाले. पहाटेपासून श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक ढोल-ताशा पथकाच्या गजरात काढण्यात आली.
देवघर येथील श्री अमृतेश्वर मंदिरात गर्दी
म्हसळा : तालुक्यातील मौजे देवघर येथील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पांडवकालीन स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिरामध्ये शुक्रवारी महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध धार्मिक कायक्रम झाले. तसेच जंगमवाडी येथील शिवमंदिर हेदेखील प्राचीन आहे. मुघलकाळामध्ये प्रार्थनेकरिता कोणतेही मंदिर जवळपास नसल्याने या मंदिराची स्थापना करण्यात आली. शिवाभिषेक करण्यासाठी भाविकांनी गर्दी के ली होती.
मोहोपाडा : चौक तुपगाव येथील ३५० वर्षांहून पुरातन हेमाडपंथी श्री धान्येश्वर मंदिरात पारंपरिक व भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. तुपगावमधील धान्येश्वर शिवालयात रात्रीपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. महाशिवरात्रीनिमित्त तुपगाव येथे मोठी यात्रा भरत असते. या ठिकाणी अमरनाथ मित्रमंडळातर्फे सर्व भाविकभक्तांना मोफत खिचडी व मोफत चहापानाची व्यवस्था केली होती. मनाचा राजा ग्रुप मंडळ तुपगाव यांच्या वतीने भाविकांना मोफत थंड पाण्याची व्यवस्था के ली होती.
पनवेल : महाशिवरात्री देशभरात मोठ्या उत्साहात साजरी क रण्यात आली. पनवेलनजीक आपटा फाटा येथील शिवमंदिरात अभिनेता हृतिक रोशन यांनी सहकुटुंब हजेरी लावत शिवलिंगाचे दर्शन घेतले. आपटा फाटा येथील शिवमंदिराची उभारणी हृतिक रोशनचे आजोबा व राकेश रोशन यांचे वडील ओमप्रकाश यांनी केली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त आवर्जून हजेरी लावत असतात. तसेच दरवर्षी रोशन कुटुंबीय या ठिकाणी महाशिवरात्रीला उपस्थित राहत असतात. या वेळी हृतिक रोशनला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.