रोहा : रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तत्पूर्वी रायगड पोलिसांच्यावतीने पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. महाराष्ट्रात ज्या दोन देवस्थानांना ब्रिटिश काळापासून सशस्त्र पोलीस मानवंदना देण्याची परंपरा लाभलेली आहे. त्यापैकी एक असलेले श्री धाविर महाराज हे रोह्याचे ग्रामदैवत आहेत. या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आला होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. पहाटे हा सलामी सोहळा आपल्या नजरेत टिपण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती, गोंधळ्यांची आरती, संबळसारखे वाद्य, घंटानाद आणि नगाऱ्यांच्या आसमंतात निघालेली महाराजांची पालखी ग्रामस्थांना दर्शन देत दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतते. यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मनवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर फुलांची रांगोळी काढण्यात येते. विशेषकरून रात्रीच्या वेळी करण्यात आलेली रोशणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते. हा रोहेकरांसाठी एक कौटुंबिक धार्मिक सोहळाच असतो. रोह्यात पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत शीतपेय व अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाते. येथील आशीर्वाद मंडळातर्फे अनेक वर्षे भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली जाते.यावेळी मंदिरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.अवधूत तटकरे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, विश्वस्त नितीन परब, विजयराव मोरे, समीर शेडगे, समीर सकपाळ, उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखीसाठी भक्तांची मांदियाळी
By admin | Published: October 24, 2015 12:58 AM