निखिल म्हात्रेअलिबाग : कार्तिकी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत गुरुवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच विधीवत पूजा करण्यात आली. कोविडमुळे नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ट्रस्टींकडून करण्यात आले होते.
वाढता कोरोना संसर्ग असल्याने अलिबाग तालुक्यातील भक्तगणांंनी वरसोली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी न करता मोबाइलवर दर्शन घेतले. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीनेदेखील भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होऊ नये याकरिता उत्तम नियोजन केले होते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता जिल्ह्यात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्यवस्थापनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकादशीच्या आदल्या दिवसापासून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारीला सुरुवात केली होती. मात्र, या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भक्तांनी ऑनलाईन दर्शनाला पसंती दिली होती. गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील मंदिरांमध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणीची विधीवत पूजा पुरोहितांच्या हस्ते पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे नव्हती गर्दी श्रीविठ्ठल-रुक्मिणीला तुळस प्रिय आहे. पण, ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर तुळशीच्या माळा विकणाऱ्यांचीही गर्दी नव्हती. प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील साजगावचे श्रीविठ्ठल मंदिर आणि अलिबागजवळील वरसोली येथील आंग्रेकालीन श्रीविठ्ठल मंदिरात काही भक्तांनी जाऊन देवदर्शन घेतले. मात्र दरवर्षीप्रमाणे गर्दी नव्हती. तर दुसरीकडे गावोगावच्या श्रीविठ्ठल मंदिरांतही भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घेतले.