राज चिंचणकरमुंबई : मराठी रंगभूमीच्या समृद्धतेचा डंका सर्वदूर वाजत असतानाच, तिच्या ललाटी आता मानाचा टिळा लागला आहे. रंगभूमीवर संत तुकारामांच्या गाथेच्या रूपाने उलगडत जाणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ या मराठी मातीतल्या नाट्यकृतीची विशेष दखल प्रख्यात ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली आहे.
संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठ्ठलाची अर्धांगिनी रुक्मिणी यांच्या भावबंधाचे दर्शन घडवणाºया या नाटकाने मराठी रंगभूमीवर नावीन्यपूर्ण प्रयोग साकारला आहे. ठरावीक साच्यात अडकलेल्या मराठी नाटकाला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवण्याचे कार्य या प्रयोगाने केले आहे. युवा लेखक व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या या नाट्यकृतीची दखल ‘फोर्ब्स’कडून घेण्यात आली आहे. ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सध्या दीडशे प्रयोगांच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या नाटकात आवलीची भूमिका शुभांगी सदावर्ते हिने, तर रखुमाईची भूमिका मानसी जोशी हिने साकारली आहे.आता जबाबदारी वाढली...‘फोर्ब्स’सारख्या महत्त्वाच्या मासिकातल्या रंगभूमीविषयक लेखात स्वतंत्र फोटो व परिच्छेद म्हणजे अभिमानाची बाब आहे. वर्षभरातल्या पाच महत्त्वाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवून, ३७ पुरस्कार मिळवल्यानंतर आता ही बातमी म्हणजे आमच्यासाठी सुखद धक्का आहे. आता जबाबदारी अधिकच वाढली आहे. मान्यवरांची शाबासकी आणि प्रेक्षकांची साथ असल्याशिवाय इतक्या उंचीवर जाणे शक्यच नव्हते.- प्राजक्त देशमुख, लेखक-दिग्दर्शक