दिघी : निळाशार नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. त्यामुळे वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मात्र, समुद्रकिनारी या खड्डेमय रस्त्यावरून ये-जा होत असताना पर्यटक व स्थानिकांना चिखलातून चालावे लागते.दिवेआगर येथे येणाऱ्या पर्यटकांनी रस्त्यावर खड्डे असल्याने नाराजी व्यक्त केली. सध्या पावसाळ्यात पर्यटन हंगाम थोडाफार कमी असलातरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी असते. स्थानिक व पर्यटकांना चिखलमय रस्त्यांच्या खड्ड्यांतून जावे लागते. या रस्त्यावरून जाताना समुद्रातील बोटीने प्रवास केल्याचा भास होतो. रस्त्यावर अगणित खड्डे चिखलयुक्त पाण्याने भरलेले पाहायला मिळतात. गणेशोत्सव, दिवाळी सुट्टीत फिरण्यासाठी अनेक पर्यटक खास करून दिवेआगर समुद्रकिनाºयाला पसंती देतात. समुद्रकिनारी मुख्य रस्त्यांवर खड्डे दुरुस्ती झाल्यास या भागातून ये-जा करणे सोयीचे होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन समुद्रालगत जोडणाºया रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. एका बाजूला शासन पर्यटकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबवित असतो. तर दुसºया बाजूला तेच उपक्रम निधीअभावी फोल ठरत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दिवेआगर समुद्रालगत जाणारे रस्ते पक्के स्वरूपात केले नाहीत.बैलगाडी जाण्यामुळे या रस्त्यावर खड्डे बनत आहेत. पावसाळा संपताच ग्रामपंचायत निधीतून रस्ता करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया दिवेआगर सरपंच उदय बापट यांनी बोलताना दिली.गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे आवाहनमुरुड जंजिरा : पुढच्या महिन्यात गणरायाचे आगमन होत असून, या अगोदरच सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने कामाला लागून मुरुड तालुक्यातील खड्डे पडलेले रस्ते बुजवून टाकावे व स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, असे प्रतिपादन अलिबाग व मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार पंडित पाटील यांनी केले. गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांची स्थिती चांगली असावी, या उद्देशाने स्थानिक आमदार पाटील यांनी शीघ्रे येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवार, २० आॅगस्ट रोजी एका विशेष सभेचे आयोजन केले होते.या वेळी तालुका चिटणीस मनोज भगत, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, धर्मा हिरवे, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, माजी सरपंच अजित कासार, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुरुड येथील सहायक अभियंता शैलेश शिंदे, सहायक अभियंता नीलेश खिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले की, साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी शासनाकडून सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची कितपत प्रगती आहे याचा बांधकाम खात्याने खुलासा करावा, यावर सहायक अभियंता शैलेश शिंदे यांनी सांगितले की, सदरचे काम निविदा स्तरावर आहे. गणपती उत्सवानंतर या कामाला सुरुवात करू, असे सांगितले. यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, निविदा स्तरावरची कार्यवाही तातडीने उरकून घ्यावी व लवकरात लवकर या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली पहिजे. सदरील रस्त्याच्या डांबरीकरणामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, पर्यटक संख्येत निश्चितच वृद्धी होईल, असा आशावाद या वेळी आमदारांनी व्यक्त केला.
दिवेआगरला खड्ड्यांचे ‘विघ्न’; पर्यटकांना चालावे लागते चिखलातून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:15 AM