आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:33 AM2018-08-14T03:33:13+5:302018-08-14T03:33:26+5:30
धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
अलिबाग - धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सरकारच्या आडमुठे धोरणाविरोधात घोषणा देत, धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. सोमवारी अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाज धडकला. सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सोमवारी सकाळी ११ वाजता अलिबाग शहरातील जिल्हा परिषद येथून मोर्चाला सुरु वात झाली. या वेळी नामदेव कटरे, महादेव खरात, मधुकर ढेबे, संजय कचरे, नामदेव कटरे, महादेव खरात, मधुकर ढेबे, संजय कचरे आदी उपस्थित होते. धनगर समाजाला देशाच्या सर्वोच्च अशा घटनेचे आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्य परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमाती (एसटी)च्या यादीमध्ये अनुक्र मांक ३६ नुसार केला आहे. त्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षणाच्या सोयी व सवलती मिळणे आवश्यक आहे. मात्र, अजूनपर्यंत सरकारने या बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे धनगर समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे.
धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती देण्याविषयी केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; परंतु सत्तेवर येऊन चार वर्षे होऊनही धनगर समाज आरक्षणाच्या सवलतीपासून दूरच राहिला आहे. मोदी व देवेंद्र सरकार धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त धनगर समाजामध्ये असंतोष खदखदत असल्याचे आंदोलकांच्या भूमिकेवरून दिसून येते.