म्हसळा : चैत्र महिन्यातील पौर्णिमेला गावात यात्रा भरत असून ग्रामदेवाचा मोठा उत्सव असतो. उत्सवात तालुक्यातील ८४ गावे सहभागी होतात. यात्रेसाठी तालुक्यातील काही गावांतून उंचच्या उंच काठ्या घेऊन लहानापासून अबालवृद्ध या यात्रेत सहभागी होतात. काठ्यांमध्ये प्रामुख्याने केलटे, कांदळवाडा, निगडी, पाभरे, चिचोंडे, खारगाव बुद्रुक, खारगाव खुर्द, ढोरजे, चिरगाव, खरसई, पेढाम्बे, आगरवाडा, सावर, म्हसळा, आदिवासीवाडी, दुर्गवाडी या गावांतून काठ्या येतात. केलटे येथील काठीला मानाचे स्थान असून, केलटे गावाच्या काठीने प्रवेश केल्यानंतर इतर गावांतील काठ्या यात्रेच्या ठिकाणी प्रवेश करतात. सर्वधर्मीयांचा यात्रेत सहभाग म्हणजे एकतेचे व अखंडतेचे प्रतीक असते. म्हसळ्यातील यात्रेनंतर इतर तालुक्यांतील गावांमध्ये यात्रा सुरू होतात. केलटे गावातील मानाची काठी असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने प्रथम होळीच्या खाचरात आणून तिला यथोचित मान दिला जातो आणि वतनदार, सालकरी, कुलकर्णी आणि ग्रामस्थ यांच्याकडून स्वागत केले जाते. मागील कित्येक वर्षांची परंपरा आजही पाहायला मिळते. मध्यरात्रीनंतर श्री धावीर देवाची पालखी संपूर्ण शहरभर घरोघरी फिरवली जाते. या वेळी आपापल्या समस्या, गाऱ्हाणी व नवस पालखीपुढे मांडली जातात आणि केलेल्या नवसांची पूर्तता केली जाते. नवसाला पावणारा धावीर देव म्हणून भक्त आळवणी करतात. (वार्ताहर)- म्हसळ्यात ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज मंदिर उद्घाटन, प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्र म शहरात ढोल-ताशांच्या गजरात आल्हाददायक वातावरणात भव्य पालखी मिरवणुकीने संपन्न झाला. श्रीवर्धन येथील बँड पथकाने मिरवणुकीत वाद्यकौशल्य दाखवून आगळा-वेगळा उत्साह आणला. म्हसळा पोलीस ठाणे पी.आय. सुदर्शन गायकवाड यांनी वाहतूक व्यवस्थेचा चोख बंदोबस्त केला होता.
धावीर देव पालखी सोहळा
By admin | Published: April 09, 2017 1:24 AM