रोहा : रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास शुक्रवारी पहाटे उत्साहात सुरुवात झाली. तत्पूर्वी रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला व पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. या वेळी मंदिरात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. सुनील तटकरे, आ. अवधूत तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जि. प. अध्यक्षा अदिती तटकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, प्रांत रवींद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशिद, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. सलामी सोहळा पाहण्यासाठी भविकांनी गर्दी केली होती.
गोंधळ्यांची आरती, संबळसारखे वाद्य, घंटानाद आणि नगाऱ्यांच्या आसमंत दुमदुमून टाकणाºया मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात मार्गस्थ झालेली महाराजांची पालखी ग्रामस्थांना दर्शन देत दुसºया दिवशी सकाळी मंदिरात परतते. या वेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात येते. महाराजांचा हा पालखी उत्सव रोहेकरांसाठी एक कौटुंबिक धर्मिक सोहळाच समजला जातो. भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.