पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी आणि खड्ड्यांमुळे आधीच चालक त्रस्त आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने चालकांसह नागरिकांनाही त्रास होत आहे.गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात रस्ते माती आणि खडीने बुजवले होते. मात्र आता चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने आणि अवजड वाहतूकही सुरू झाल्याने महामार्गावर धुळीचे लोट पाहायला मिळत आहेत.गणेशोत्सवाच्या काळात सतत पाऊस सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमधील माती ओली होवून ती घट्ट बसली होती. मात्र दोन-तीन दिवसांपासून कडकडीत ऊन पडल्यामुळे माती कोरडी झाली आहे. त्यातच अवजड वाहनांमुळे सर्वत्र धूळ उडत आहे. एखादे अवजड वाहन खड्ड्यातून आदळत गेल्यास धुळीचे लोट उडतात. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे फाटा ते पेणपर्यंत खड्डे पडलेल्या मार्गावर धुळीचे लोट दिसत आहेत. चारचाकी चालकाला याच त्रास होत नसला तरी दुचाकी चालकाला मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या धुळीमुळे डोळ्यांचे गंभीर आजार जडण्याची शक्यता नेत्र चिकित्सकांनी वर्तवली आहे. वाहन चालकासह बंदोबस्तासाठी असलेल्या वाहतूक पोलिसांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. चिंचवन, कल्हे, पळस्पे, शिरढोण, बांधनवाडी पनवेलमधील या मार्गासह संपूर्ण गोवा रोडवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता या मार्गावर ठिकठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. यामुळे दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. समोरील दिसत नसल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य; खड्ड्यातील माती, खडी रस्त्यावर : चालकांसह नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 3:15 AM