मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:55 AM2019-11-04T01:55:58+5:302019-11-04T01:56:09+5:30
कोलाड ते वाकण प्रवास खडतर : प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
धाटाव : मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड, खांब, सुकेळी, वाकण या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर प्रचंड पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले होते, त्यामुळे येथील खड्डे बुजविण्यासाठी खड्ड्यात माती मिश्रित खडी टाकण्यात आली. पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर आता पाऊस थांबल्यामुळे सर्वत्र धूळ पसरली आहे.
मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असून चिखलाचे रूपांतर धुळीत झाले आहे. ही सर्व धूळ प्रवाशांच्या व महामार्गालगत असणाऱ्या गावातील ग्रामस्थ नागरिकांच्या अंगावर उडत आहे, यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही धूळ नागरिकांच्या नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अतिशय मंदगतीने सुरू असून हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही; परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे प्रवासी त्रस्त होतात, यामुळे कंबरदुखीसारखे आजार तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे खोकला, सर्दी यासारखे आजार होताना दिसत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असून धूळ प्रवाशांच्या डोळ्यात उडत आहे, यामुळे अपघातही होताना दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे वाटत असताना नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु पाच ते सहा वर्षे रस्त्याचे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.
शिवाय एक खड्डा भरण्यासाठी आठ दिवसांतून चार ते पाच वेळा भर टाकली तरी खड्डा भरेना, अशी अवस्था आहे. याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याने लक्ष द्यावे,
अशी मागणी प्रवाशांकडून होत
आहे.