- मधुकर ठाकूरउरण - धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शेमटीखार येथील रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे, तसेच सदर रेल्वे स्थानकात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुतूम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी चर्चा करताना सांगितले की लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या १९८४ सालच्या शेतकरी लढ्यात धुतूम गावातील शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.या लढ्यात धुतूम गावातील शेतकरी रघुनाथ अर्जुन ठाकूर यांना वीरमरण आले होते.अशा हुतात्म्यांच्या बलिदानानी पावन झालेल्या धुतूम गावातील मौजे शेमटीखार येथे सिडको आणि रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानक उभारत आहे.त्या रेल्वे स्थानकाला धुतूम रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे यासाठी वारंवार सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.
परंतु सिडको आणि रेल्वे प्रशासनाने धुतूम रेल्वे स्थानक असे नाव न देता रांजणपाडा रेल्वे स्थानक नाव देऊन धुतूम गावातील हुतात्म्यांच्या बलिदानाची थट्टा करुन धुतूम गावाचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला आहे.हे कदापी सहन करणार नाहीत.त्यामुळे रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात यावे, तसेच सदर रेल्वे स्थानकात धुतूम गावातील बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीसाठी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च २०२३ रोजी मार्चा काढण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
यावेळी सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता ठाकूर,माजी सरपंच अमुत ठाकूर,माजी सरपंच शंकर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर,प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर,रविनाथ ठाकूर, सुचिता कडू,स्मिता ठाकूर,अनिता ठाकूर,कमळाकर पाटील,माजी उपसरपंच शरद ठाकूर,काँग्रेस गाव अध्यक्ष शंकर ठाकूर, रामनाथ ठाकूर,कुष्णा ठाकूर,शंकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कडू,अरुण ठाकूर, उद्योगपती नारायण ठाकूर, ग्रामसेवक विलास म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधीच बोकडवीरा,नवघर ग्रामस्थांनी स्थानकांची नावे बदलण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.त्यामध्ये नव्याने धुतुम ग्रामस्थांची भर पडली आहे.