उरण : रेल्वे स्थानकाच्या नाव बदलण्यासाठी धुतुम ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:21 PM2023-03-23T14:21:50+5:302023-03-23T14:23:05+5:30

मागील २५ वर्षांपासून रेल्वे स्थानकाला धुतुम नाव देण्याची मागणी आहे.

Dhutum villagers march to railway station to change name of railway station uran | उरण : रेल्वे स्थानकाच्या नाव बदलण्यासाठी धुतुम ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकावर मोर्चा

उरण : रेल्वे स्थानकाच्या नाव बदलण्यासाठी धुतुम ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकावर मोर्चा

googlenewsNext

मधुकर ठाकूर

मागील २५ वर्षांपासून रेल्वे स्थानकाला धुतुम नाव देण्याची मागणी असताना मात्र सिडको, रेल्वे प्रशासनाने राजणपाडा नाव दिले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (२३) शंभर टक्के धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रांजणपाडा रेल्वे स्थानकाचे नाव दुरुस्त करून धुतूम रेल्वे स्थानक असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी रेल्वे स्थानकावरच मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. याआधीच बोकडवीरा, नवघर ग्रामस्थांनी स्थानकांची नावे बदलण्यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. त्यामध्ये नव्याने धुतुम ग्रामस्थांची भर पडल्याने सिडको, रेल्वे प्रशासनाची डोकेदुखीत आणखीनच वाढली आहे. 

 शंभर टक्के धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्थानिकाला धुतुम रेल्वे स्थानक असे नाव देण्याची मागणी तत्कालीन कॉंग्रेसचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी केली होती. याबाबत सिडको, रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहारही सुरू होता. मात्र २५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर मात्र सिडको, रेल्वे प्रशासनाने धुतुम ऐवजी रांजणपाडा देऊन ग्रामस्थांचा रोष ओढवून घेतला आहे. रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला असतानाच मात्र धुतुम ग्रामस्थांनी नाव बदलण्यासाठी संघर्षांची भुमिका घेतली आहे. धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली धुतूम ग्रामपंचायत कार्यालयात नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे स्थानकाला रांजणपाडा ऐवजी धुतूम रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे, रेल्वे स्थानकात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी सदर रेल्वे स्थानकात व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सिडको आणि रेल्वे प्रशासन कार्यालयावर २३ मार्च रोजी  मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला होता.

ग्रामस्थांच्या निर्धारानंतर गुरुवारी (२३) सरपंच सुचिता  ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रांजणपाडा ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता.घोषणाबाजी करीत  काढण्यात आलेल्या मोर्चात उपसरपंच कविता ठाकूर,माजी सरपंच अमुत ठाकूर,माजी सरपंच शंकर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर,प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर,रविनाथ ठाकूर, सुचिता कडू,स्मिता ठाकूर,अनिता ठाकूर,कमळाकर पाटील,माजी उपसरपंच शरद ठाकूर, गाव अध्यक्ष शंकर ठाकूर, रामनाथ ठाकूर,कुष्णा ठाकूर,शंकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कडू,अरुण ठाकूर, उद्योगपती नारायण ठाकूर, माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, ग्रामसेवक विलास म्हात्रे आदींसह  शेकडो ग्रामस्थ काळे कपडे ऊ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वक्त्यांनी स्थानकाला रांजणपाडा ऐवजी धुतुम रेल्वे स्थानक नाव बदलल्या शिवाय माघार घेतली जाणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Dhutum villagers march to railway station to change name of railway station uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.