ध्यास ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा

By admin | Published: October 26, 2015 11:41 PM2015-10-26T23:41:18+5:302015-10-27T00:12:23+5:30

बुध्दघोष गमरे : महिलांसाठी आरोग्य शिबिरे व चर्चासत्रातून जागृती

Dhyas rural women empowerment | ध्यास ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा

ध्यास ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा

Next

चिपळूण तालुक्यातील बामणोली, वाघिवरे, बोरगाव, कळमुंडी, कौंढर ताम्हाणे या ग्रामीण भागात कष्टकरी महिलांची संख्या मोठी आहे. सतत शेतीच्या कामात मग्न असणाऱ्या या महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. शिवाय काही वेळा त्या महिला कुटुंबासाठी स्वत:कडे दुर्लक्ष करतात. कष्टकरी महिलांचे आरोग्य सुदृढ व्हावे, त्यांना वेळेच्या वेळी उपचार मिळावेत, यासाठी पंचशील सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेऊन त्यांची तपासणी केली जाते, तर चर्चासत्राद्वारे त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली जाते.

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी असे महिलांच्या बाबतीत सातत्याने म्हटले जाते. कुटुंबासाठी राबराब राबणारी महिला आपल्या शारीरिक व्याधींकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष करते. घरात कोणी आजारी पडले तर त्याच्या सेवेत लीन असणारी महिला स्वत: आजारी पडली तर फारसे मनावर घेत नाही. वय वाढत चालले की, त्यांच्यामध्ये वयपरत्वे आजारांची संख्या बळावते. त्यातून अनेक लहान-मोठ्या व्याधी निर्माण होतात. वेळीच लक्ष दिले नाही तर त्यांना काही वेळा आपला प्राण गमवावा लागतो किंवा अपंगत्व पत्करावे लागते. या महिलांच्या नेमक्या समस्या जाणून उपचार व्हावेत, यासाठी पंचशील सामाजिक संस्थेने गेली तीन वर्षे सातत्याने आरोग्यविषयक शिबिर व चर्चासत्र राबवून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सामाजिक भान ठेवून संस्थेचे अध्यक्ष बुध्दघोष गमरे यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : महिला सक्षमीकरणावर भर द्यावा, असे का वाटले?
उत्तर : ग्रामीण भागातील महिला सतत राबत असतात. सातत्याने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी घाम गाळताना त्यांना अनेक कष्टातून जावे लागते. वेळेवर अन्न, पाणी पिण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे आपल्या निदर्शनास आले. वालावलकर रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध शिबिरे घेतली जातात, याची माहिती मिळाली. त्यांची काही शिबिरे जवळून पाहिली आणि आपल्या पंचक्रोशीतील महिलांनाही याचा लाभ द्यावा, अशी प्रेरणा मिळाल्याने आपण त्या कामाकडे वळलो. कुटुंबातील महिला सुदृढ असेल, सुखी असेल व आनंदी असेल तर संपूर्ण कुटुंब उत्साहात राहाते, असे आपले मत असल्याने आपण या विषयावर अधिक भर दिला.
प्रश्न : महिलांसाठी आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबविले?
उत्तर : तीन वर्षांत महिलांसाठी ६ आरोग्य शिबिरे घेतली. काही महिलांमध्ये पोटदुखीचे प्रमाण अधिक आढळले. काहींना गर्भाशयाच्या अडचणी, अनियमित मासिक पाळी, हाडांचे विकार आढळून आले. अशा महिलांना स्वत: गाडी करुन डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले. यासाठी वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी संपूर्ण सहकार्य केले. औषधासाठीचा खर्च संस्थेने उचलला. किशोरवयीन मुलींमध्ये न्यूनगंड असतो. त्यांची अवस्था सैरभैर असते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व शारीरिक वाढ होत असताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत चर्चासत्र घेण्यात आली.
प्रश्न : महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा आर्थिक विकासासाठी काही योगदान दिले का ?
उत्तर : ग्रामीण भागातील महिला स्वत:चे कुटुंब चालवून शेतीची कामे करतात. त्यांच्या हाती फारसा पैसा नसतो. अनेकवेळा गरज असतानाही त्यांना पैसे मिळत नाहीत. पैशांसाठी त्यांना आपल्या पतीवर अवलंबून राहावे लागते. महिलांच्या हाती पैसे नसल्याने त्यांची कुतरओढ होते. यासाठी त्यांच्या हाती चार पैसे यावेत म्हणून महिलांचे बचत गट स्थापन करुन त्यांना विविध शिबिरांद्वारे मार्गदर्शन केले. कामधंदा सांभाळून छोट्या छोट्या व्यवसायातूनही गरजेपुरते पैसे उभे करता येतात, याची जाणीव त्यांना करुन देण्यात आली. बचत गटांच्या माध्यमातून आज अनेक महिला सक्षम होत आहेत.
प्रश्न : शेकडो मुलांसाठी घेतलेल्या शिबिरांचा अनुभव कसा होता ?
उत्तर : शालेय मुलांसाठी २५०ची आपण दोन शिबिरे घेतली. एकूण ५०० विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. या शिबिरात संस्थेने विद्यार्थ्यांच्या उपाहारापासून जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था केली होती. बामणोली शाळेच्या सुबोध गमरे या विद्यार्थ्याच्या फुप्फुसामध्ये पाणी झाल्याचे या शिबिरात निदर्शनास आले. संस्थेच्या माध्यमातून त्याला वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर संस्थेने संपूर्ण उपचार करून घेतले. त्याच्या उपचारासाठी ५ हजार रुपयांची मदतही केली. आज हा विद्यार्थी पूर्ण बरा झाला असून, नियमित शाळेत जात आहे. हा एक अनुभव विलक्षण होता. मुलांसाठी शासनाच्या धोरणानुसार मोफत रक्तगट तपासणी करुन दिली.
प्रश्न : संस्थेचे इतर उपक्रम कोणते?
उत्तर : ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध प्रकारची पुस्तके त्यांना सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी शासनानेही तिच संकल्पना वाचन प्रेरणा दिन नावाने राबविली. काळाची पावले ओळखून आमच्या संस्थेने हा उपक्रम तत्पूर्वीच राबवला होता. नजीकच्या भविष्य काळात संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची इमारत बांधण्याचा आमचा संकल्प आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता बोरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी साग व काजूची २५० रोपे दिली होती. बामणोली गिरसा डोंगर येथे फणसाच्या ३५०० बिया लावल्या, जेणेकरून फळे मिळतील आणि डोंगराची होणारी धूप थांबेल, हा हेतू आहे.
ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई असते. याचा विचार करुन गेली दोन वर्षे सातत्याने कोंडमळा व वाघिवरे कदमवाडी या दोन गावात पिण्याच्या पाण्याचा मोफत पुरवठा करण्यात आला. कौंढर बौध्दवाडी येथील शेतकऱ्यांना मोफत खतपुरवठा करण्यात आला. या उपक्रमाचे पंचक्रोशीत सर्व शेतकऱ्यांकडून कौतुकही झाले. त्यामुळे भविष्यात समाजोपयोगी भरीव काम करायचे व ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ सामान्य माणसांच्या हितासाठी व सुखासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यातून इतर संस्थाही प्रेरणा घेऊन काम करतील. त्याचा लाभ सर्व समाजाला मिळेल, हीच अपेक्षा आहे. भविष्यात युवा नेतृत्व घडवण्यासाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
                                                                                                                                      - सुभाष कदम

Web Title: Dhyas rural women empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.