वैभव गायकरपनवेल : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर आजारांच्या रुग्णांचे मोठे हाल होत असून, डायलेसिस रुग्णांचीही मोठी फरफट सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला एमजीएम रुग्णालय वगळता पनवेलमधील डायलेसिसच्या रुग्णांना खासगी दवाखान्यांत फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात लवकरच सेंटर सुरू होणार आहे.
सरकारी रुग्णालयाच्या तुलनेने हे खर्चिक असल्याने डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर सुरू करण्याची मागणी होत होती. उपजिल्हा रुग्णालयाच्या दुसºया मजल्यावर हे सेंटर उभारले गेले आहे. यामध्ये ६ खाटांचे मॉड्युलर आयसीयू व ८ बेडच्या मॉड्युलर आयसीयू सेंटरचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच उपजिल्हा रुग्णालयांपैकी ही अत्याधुनिक यंत्रणा पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे. या सेंटरमध्ये मशिनरी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
येथे मेडिकल गॅस पाइपलाइन, एअर हँडलिंग युनिट, डायलेसिस मशीन, वेंटिलेटर रूम, आयसोलेशन रूम आदींचा समावेश आहे. डायलेसिसच्या रुग्णांसाठी चार तासांत एक डायलेसिस होणार असून, आठ खाटांवर विविध डायलेसिस रुग्णांना त्यांचा फायदा मिळणार आहे. खासगी रुग्णालयात डायलेसिस करताना खर्च जास्त येतो. त्यातच मोजक्या सेंटरमध्ये अशी सुविधा कार्यान्वित आहे. या सेंटरमुळे गरीब व गरजूंना उपयोग होणार आहे. अत्याधुनिक आयसीयू सेंटरदेखील येथे कार्यान्वित होणार असून, अत्यावश्यक वेळेला संबंधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. याकरिता ६ खाटांचे हे आयसीयू सेंटर आहे. व्हेंटिलेटरची व्यवस्था असल्याने रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवावे लागणार नाही.कोरोनाचा फटकाकोरोनामुळे इतर आजारांच्या रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालय पनवेलला कोविड १९चा दर्जा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहेत. त्यामुळे डायलेसिस सेंटर सुरू करण्याबाबत दुर्लक्ष झाले आहे.डॉक्टर आणि टेक्निशियन्सच्या नियुक्तीअभावी हे सेंटर सुरू होऊ शकले नाही. या संदर्भात सिव्हिल सर्जनकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हे सेंटर सुरू होईल. - डॉ. नागनाथ यमपल्ले, अधीक्षक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय