अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:41 AM2018-07-27T00:41:31+5:302018-07-27T00:41:57+5:30

कोळीवाडा, शास्त्रीनगरमधील ३७५ नागरिकांच्या रक्ताची तपासणी; ९७ जणांमध्ये मलेरियाची प्राथमिक लक्षणे

Dibrugarh 110 suspects in Alibaug! | अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित !

अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित !

Next

अलिबाग : अलिबाग शहरामध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. काही दिवसांपूर्वी सुजित भगत या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आता यशोदा यशवंत नर या महिलेलाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत परिसरातील ३७५ जणांच्या रक्ताचे नमुने तपासले आहेत. पैकी ११० जणांचे डेंग्यूबाबत आणि ९७ जणांमध्ये मलेरियाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने त्यांच्या रक्ताचे नुमने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.
शहरात डेंग्यू, लेप्टो यासारखे संसर्गजन्य आजार रोखण्यात अलिबाग नगर पालिका अपयशी ठरली आहे. शहरातील दोन नागरिकांचा डेंग्यूने बळी घेतल्याने याला सर्वस्वी अलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली. या प्रकरणी शुक्रवारी पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डेंग्यूने मरणारे नागरिक अलिबागमधीलच डेंग्यूच्या डासाने कसे काय मरण पावले असतील, असा सवाल करणारे अलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी हे संवेदनशून्य आहेत. शहरातील सुदृढ आरोग्य राखण्यात ते कमी पडले असताना त्यांच्याकडून असंवेदनशील उत्तरे दिली जात असल्याचे मोहिते यांनी सांगितले. अलिबाग येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अलिबागमध्ये डेंग्यूने दोन नागरिकांचा बळी घेतला आहे, असे असतानाही नगर पालिका प्रशासनाने शहरात फॉगिंग मशिन, गटारांवर औषध फवारणी करताना दिसून येत नाही. नगर पालिका प्रशासन शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यात अपयशी ठरली आहे. शहरांमध्ये फॉगिंग मशिन दररोज फिरवले जात असल्याचा चौधरी यांचा दावा साफ खोटा असल्याचे संघर्ष समितीचे संजय सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अलिबागमधील सुजित भगत आणि यशोदा नर यांच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चौधरी यांच्याकडे शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून उत्तरच मिळत नसल्याची खंत सावंत यांनी व्यक्त केली. डेंग्यूमुळे शहरात दुसरा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रुग्णालयात साहित्यासाठी १० लाख
शहरांमध्ये स्वच्छता राखून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात नगर पालिकेला अपयश आले आहे. दुसरीकडे अलिबाग सरकारी रुग्णालयामध्ये डेंग्यूची उपाययोजना करण्यासाठी कक्ष स्थापने, तसेच त्यासाठी लागणारे विविध साहित्य, रक्ताची तपासणी करण्यासाठी लागणारे साहित्य यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आमदार फंडातून १० लाख रुपये देऊ केले असल्याची माहिती मोहिते यांनी दिली. चौधरी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अलिबागमध्ये डेंग्यूमुळे सुजित भगत आणि यशोदा नर यांचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणाही जागी झाली आहे. अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयाने शहरातील कोळीवाडा आणि शास्त्रीनगर परिसरातील ३७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले. त्यामध्ये ११० डेंग्यू आणि ९७ नागरिकांची मलेरियासंबंधी चाचणी करण्यासाठी मुंबईला रक्त नमुने पाठवण्यात आले आहेत.
- डॉ. अमोल भुसारे, जिल्हा सरकारी रुग्णालय

अलिबाग शहरामध्ये डेंग्यूने दोन जणांचा बळी गेलेला असताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वैशाली पाटील या पनवेल येथे दौऱ्यावर गेल्या होत्या, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील तांत्रिक विभागाचे अनिल गुरव यांनी दिली. अलिबाग शहरामध्ये बुधवारी जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मदतीने कॅम्प घेतला होता. त्यामध्ये रक्ताचे नमुने गोळा केले. मात्र तपासणीचे मशिन बंद पडल्याने नमुने आता ठाण्याला पाठवण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.
अलिबाग शहरातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही संबंधित प्राधिकरणाची आहे. डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतरच हिवताप अधिकारी कार्यालयाने कॅम्प घेतले. या आधी हे कार्यालय काय करत होते, असा सवाल संजय सावंत यांनी केला आहे.

शहरामध्ये डेंग्यू पसरण्याच्या भीतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांना डेंग्यू, मलेरिया यासह अन्य साथीच्या आजारांबाबत माहिती व्हावी, तसेच त्यापासून कसे संरक्षण करावे, काय उपाययोजना कराव्यात याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तापाची लक्षणे दिसताच त्यांनी नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा, रक्ताची तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणीत झोपावे, टायर, जुनी भांडी यामध्ये पाणी साठू देऊ नये, घरामध्ये कोरडा दिवस पाळावा, असेही भुसारे यांनी सांगितले.

Web Title: Dibrugarh 110 suspects in Alibaug!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.