मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, किरीट सोमय्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:05 PM2022-02-18T16:05:46+5:302022-02-18T16:06:25+5:30
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली.
अलिबाग
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली. किरीट सोमय्या यांनी कालच आपण कोर्लई गावाला भेट देऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज ते कोर्लई गावात येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली होती. भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं ग्रामपंचायत परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त संपूर्ण परिसरात ठेवला होता. ग्रामपंचायतीला भेट देऊन किरीट सोमय्यांनी एक पत्रक ग्रामसेवकांना दिलं आणि ते रेवदांडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निगाले. रेवदांडा पोलिसांशी चर्चा केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.
"सरपंच म्हणतात बंगले अस्तित्वात नाहीत. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. मग नेमकं खरं काय? हे जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो. यासंपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. चर्चा एकदम व्यवस्थित झाली आहे. शिवसैनिक जमले होते. पण पुण्यासारखा प्रसंग इथं घडलेला नाही", असं किरीट सोमय्या म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर उपस्थित केला सवाल
"ग्रामपंचायत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिनिधीत्व करत आहे. ग्रामपंचायत म्हणते की सदरहू जागेवर बंगले अस्तित्वात नाहीत. पण मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. नेमकं खरं काय आहे ते कळायला हवं. आम्ही ग्रामसेवकाला कागदपत्रे दिली. त्यावर आजची स्थिती दोन दिवसात कळवतो असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन चार तासांमध्ये बंगले कसे गायब होतात. सकाळी म्हणतात बंगले आहेत आणि दुपारी म्हणतात बंगले नाहीत. आता दोन-तासांत उद्धव ठाकरेंनी येऊन बंगले तोडले असतील तर पोलिसांनी चौकशी करावी. महाराष्ट्राच्या जनतेला मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही रश्मी ठाकरे यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का? हे सर्वांना कळू द्या", असं किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्या निघून जाताच ग्रामपंचायतीचं शुद्धीकरण
किरीट सोमय्या ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पंचायत कार्यालयात सोमय्या गेले आणि पाचच मिनिटांत ते बाहेर आले. सोमय्या यांनी सरपंच मिसाळ यांना नमस्कार केला आणि खुर्चीत बसले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी एक पत्रक ग्रामपंचायतीला दिलं. त्यानंतर किरीट सोमय्या आणि प्रशांत ठाकूर कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी ग्रामपंचायतशी एकाशब्दानंही चर्चा केली नाही किंवा कोणत्याही माहितीची विचारपूस केली नाही. ते केवळ ड्रामेबाजीसाठी आले होते, अशी टीका सरपंच प्रशांत मिसळ यांनी केली आहे. किरीट सोमय्या तिथून निघून जाताच शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचं गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केल्याचंही मिसाळ यांनी सांगितलं.