डिझेलचे दर घटले तरी सागरी प्रवास महागच, प्रवाशांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 02:59 AM2019-01-07T02:59:26+5:302019-01-07T02:59:48+5:30
प्रवाशांमध्ये नाराजी : दरवाढ कमी करण्याची मागणी
आविष्कार देसाई
अलिबाग : सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. सरकारने गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मात्र, सागरी प्रवासी वाहतुकीचे वाढलेले दर कमी न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर मध्यंतरी वाढले होते. त्यामुळे सागरी प्रवासी सेवेच्या तिकीटदरामध्ये वाढ करण्यात आली होती. आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने सागरी प्रवासी सेवेच्या तिकीट दरांमध्ये संबंधित सेवा पुरवणाºया संस्थांनी कपात करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अलिबाग हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण झाले आहे. राज्यभरातून बाराही महिने कमी-अधिक प्रमाणात पर्यटकांचा ओघ सुरूच असतो. अन्य देशातील पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. आंतरराष्ट्रीय पर्यटक मुंबईमार्गे अलिबागमध्ये प्रवेश करतात. पैकी बहुतांश पर्यटक सागरी मार्गाला पसंती देतात. सागरी मार्गामुळे पैशासह वेळेचीही बचत होते. मुंबई-गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा असा सागरी प्रवास आणि तेथून पुढे मांडवा ते अलिबाग अशा रस्ते प्रवासाची (बसने) सुविधा आहे. पीएनपी, मालदार आणि अजंठा या संस्था प्रामुख्याने ही सेवा पुरवण्याचे काम करतात. मोठ्या संख्येने पर्यटकांची ने-आण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
च्सुरुवातीला या सेवा स्वस्त होत्या, कालांतराने पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने या सेवेच्या तिकीट दरामध्ये वाढ होत गेली. मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या दराने उसळी मारली.
सागरी प्रवास हा स्वस्त व चांगला पर्याय आहे, परंतु तो आता महाग होत आहे. डिझेल स्वस्त झाल्याने तिकिटांचे दर कमी झालेच पाहिजेत. त्याचबरोबर बोट सेवांना परवानगी मेरीटाइम बोर्ड देते, तसेच करही तेच वसूल करतात. मात्र, तिकिटाचे दर ठरवण्याचा अधिकार हा मुंबई पोर्ट ट्रस्टला आहे. यामध्ये सुसूत्रता आली पाहिजे.
- संजय सावंत,
आरटीआय कार्यकर्ते
डिझेलचा दर हा ७९ प्रतिलीटर रुपयांवर गेल्यामुळे सागरी सेवा पुरवणाºया बोट संस्थांनी आपल्या फेरी सेवेच्या दरामध्ये सुमारे १५ ते २० रुपयांची वाढ केली. दरामध्ये वाढ करताना ती लगेचच केली नसल्याचे कारण संस्थांनी दिले होते. आता मात्र डिझेलचे दर हे ६५ प्रतिलीटर रुपयांवर आले आहेत. त्यानुसार आता संस्थांनी फेरीसेवेच्या तिकीट दरामध्ये कपात करावी.
- दिलीप जोग, अध्यक्ष,
वेलफेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर आॅफ कोकण
तिकिटांचे दर ठरवण्याचा अधिकार हा मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे, असे मेरीटाइम बोर्डाचे अनिल शिंदे यांनी सांगितले.
अपघातात दिली जात नाही नुकसानभरपाई
च्मांडवा-गेटवे आॅफ इंडिया फेरी सेवा देणाºया मांडवा ते अलिबाग अशी बससेवा मोफत देतात. त्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कोणतीच नुकसान भरपाई देण्यात येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
च्तिकिटाचे दर ठरवताना आॅपरेटर / व्हेसलचे तिकीट दर ठरवताना त्यामध्ये बोटीची किंमत, अश्वशक्ती-इंजिन, डिझेलचा होणारा वापर, आसन व्यवस्था, एसीसारखी अन्य सुविधांचा विचार करून ठरवावा, याकडेही जोग यांनी लक्ष वेधले.