जिल्ह्यातील दुष्काळसदृश तीन तालुक्यांत सवलती लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:59 PM2018-10-30T22:59:47+5:302018-10-30T22:59:57+5:30
राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन या तीन तालुक्यांचा समावेश आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने उपाययोजना व सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पाहणी निकषांनंतर लागू झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, श्रीवर्धन या तीन तालुक्यांत शासनाने २३ आॅक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
तीन तालुक्यांत जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे, या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी तीनही तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले असल्याचे सांगितले.
‘लोकमत’ने सातत्याने रायगड जिल्ह्यातील शेती नुकसान व दुष्काळी परिस्थितीबाबत पाठपुरावा केल्यामुळेच या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळू शकला आहे.