सिकंदर अनवारे
दासगाव : गेली वर्षभर सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी यावर मात करण्यासाठी आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्यासाठी अनेक तरुण पुन्हा शेतीकडे वळले आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातून गावी आलेल्या आणि शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक तरुणांनी शेतीकडे पावले उचलली आहेत. महाडमधील काही तरुणांनी शेती करत त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविण्यात यश संपादन केले आहे.शिक्षण घेऊन देखील नोकरी नाही अशी अवस्था गेली काही वर्ष दिसून येत आहे. पदवीधर तरुणदेखील नोकरीच्या अपेक्षेने बसून आहेत. सातत्याने होत असलेल्या बदलामुळे नोकरी मिळणे देखील कठीण झाले आहे. औद्योगिक क्षेत्रासह सरकारी नोकरभरती देखील होत नसल्याने तरुणांना मिळेल ते काम करावे लागत आहे. कोरोनामुळे राज्यात गतवर्षी बेरोजगारी २० टक्क्यांपर्यंत जावून पोहोचली होती. देशभरात सुमारे १२ कोटींच्यावर लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामध्ये तग धरून राहिला तो कृषी उद्योग. माणसाला लागणारे अन्न ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तयार होते ते कृषी क्षेत्राकडे तरुणांनी पुन्हा पावले उचलली आहेत. कृषी क्षेत्रातील मेहनतच तुम्हाला यश आणि पैसा मिळवून देणार हे कोरोना महामारीने दाखवून दिले आहे. यामुळे संचारबंदीमध्ये मुंबई, सुरत, पुणे आदी शहरातून गावी आलेल्या तरुणांनी पुन्हा शेती करण्याकडे भर दिला आहे.
महाडमधील पदवीधर तरुण हर्षल सुरेश कांबळे या तरुणाने संगणकीय पदवी घेतलेली असताना आणि घरात सुखसंपत्ती असतानादेखील आपल्याकडील पडिक जमिनीत त्याने भाजीपाला लागवड करत कोरोनामध्येदेखील उत्पादन मिळवले आहे. महाडमधील आकले गावात नदीकिनारी हर्षल सुरेश कांबळेच्या वडिलांच्या मालकीची जवळपास तीन एकर जमीन आहे. गेली अनेक वर्ष ही जमीन पडिक राहिली होती. नदीच्या पाण्याचा वापर करून या जमिनीत काही तरी केले पाहिजे या हेतूने त्याने शेती करण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला त्याने गावातीलच महिला मजुरीने घेऊन जमिनीची मशागत करून घेतली आणि एका स्थानिक संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना राबवत विविध भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. आता हर्षल या जमिनीत स्वतः मेहनत घेत कोबी, वांगी, दुधी, मिरची. याचबरोबर त्याने गहू देखील पेरला आहे. महाडमध्ये आणि परिसरात ही भाजी विकली जाते शिवाय काही हॉटेलचालक देखील याठिकाणी येऊन लागणारी ताजी आणि पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने तयार झालेली भाजी घेऊन जातात असे हर्षलने सांगितले.
शेतीला प्राधान्य देत पालेभाजी लागवडमहाड तालुक्यातील रावतळी विन्हेरे गावातील आशिष पवार हा तरुणदेखील कोरोनामुळे मुंबई सोडून आपल्या गावी आला. उपजीविका कशी करायची असा प्रश्न समोर असताना त्याने शेतीला प्राधान्य देत गावातील जमिनीवर पालेभाजी लागवड करण्यास सुरवात केली. पालेभाजीला असलेली मागणी लक्षात घेता आशिष पवार याने मुळा, माठ, याचबरोबर भेंडी, वांगी याची लागवड केली आहे. पालेभाजी स्वतः विक्रीकरिता महाड शहरात आशिष पवार आणत असल्याने ग्राहकांनादेखील ताजी भाजी मिळत आहे. मुंबई सोडल्यानंतर अनेकांना काय करायचे असा प्रश्न डोळ्यांसमोर असताना आशिष पवार यांनी एक वेगळाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. पालेभाजी लागवड करण्यापूर्वी आशिष पवार याने झेंडू फूल लागवड केली.