वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:02 AM2019-06-20T00:02:26+5:302019-06-20T00:02:34+5:30

म्हसळ्यात अनेक पदे रिक्त; शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

Difficulties in resolving electricity consumers complaints | वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात अडचणी

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यात अडचणी

Next

- अरुण जंगम 

म्हसळा : म्हसळा शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मात्र ट्रान्सफॉर्मरमधील तांत्रिक बिघाड, वीजवाहिन्या, खांब कोसळल्यावर तक्रारी निवारण्यासाठी महावितरणकडे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
मागील वर्षी बदलून गेलेले कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि यापूवीर्ची रिक्त पदे यामुळे सुमारे २९ कर्मचाऱ्यांची तूट म्हसळा तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

वीज वितरण कंपनीच्या म्हसळा उपविभागात म्हसळा शहर, म्हसळा ग्रामीण, मेंदडी, खामगाव, आंबेत ही पाच शाखा कार्यालये येतात. प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक कर्मचारी पदे रिक्त आहेत. पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे तसेच वारा आणि विजेच्या धक्क्यांमुळे तांत्रिक बिघाड होत आहेत. संपूर्ण तालुक्यात वीजवाहक तारांचे जाळे पसरल्यामुळे छोट्याशा बिघाडासाठी संपूर्ण शाखा कार्यालय अंतर्गत येणारा विभाग अंधारात जातो. या बिघाड दुरुस्तीसाठी नैसर्गिक अडचणीसोबत कर्मचारी तुटवड्याची अडचण येथील अधिकारी व कर्मचाºयांना भेडसावत आहे.

म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात डोंगर, खाडीपट्टा आणि जंगल भागातून विजेच्या तारा गेल्या आहेत. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा, झाड कोसळल्याने वीज खंडित होते. त्यातच कर्मचारी अपुरे असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास तासन्तास लागतात. म्हसळा विभागात आलेले अनेक कर्मचारी बाहेरगावचे आहेत. नागपूर, भंडारा आदी विभागातून आलेले हे कर्मचारी नोकरी मिळण्याकरिता कोकण विभागात येतात आणि नियमाप्रमाणे तीन वर्षे पूर्ण करून पुन्हा आपल्या गावी परत जातात. यामुळे कोकणातील कर्मचारी तुटवडा कायमच राहतो. याचा फटका थेट ग्राहकांना बसत असून याची दखल महावितरणने घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

म्हसळा महावितरण उपविभागांतर्गत ८४ गावे येत असून सुमारे ५० हजार वीज ग्राहक आहेत. या गावातून विजेपोटी ९५ टक्के बिल वसुली होत असून चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे महावितरणने येथे पुरेसे मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत म्हसळा महावितरण उपविभागांतर्गत पाच शाखा असून ५५ कर्मचाºयांची गरज आहे. मात्र जवळपास २९ पदे रिक्त आहेत. म्हसळा तालुक्यात गेल्या महिन्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या दिवशीपासून आजपर्यंत रात्री अपरात्री दिवसाही वीज खंडित होण्याचे, तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार सुरूच आहेत. तरी वरिष्ठ कार्यालयाने कर्मचारी समस्येकडे तातडीने लक्ष घालून रिक्त पदे भरून समस्या दूर करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

म्हसळा तालुक्यातील रिक्त पदांच्या पूर्ततेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून लवकरात लवकर ही पदे भरली जातील. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल.
- दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, पेण, वीज वितरण

पावसाळ्यात तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा बंद पडतो. म्हसळा तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असल्याने वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. तरीही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. अपुºया मनुष्यबळाबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले असून लवकरच ही रिक्त पदे भरण्यात येतील.
- यादव इंगळे, कार्यकारी अभियंता, महावितरण म्हसळा उपविभाग

मेंदडी, खामगाव, आंबेत, म्हसळा ग्रामीण या चारही विभागातील सेक्शन इंजिनीअरने गतवर्षी बदली करून घेतली आहे. चारही विभागातील सेक्शन इंजिनीअर यांनी बदली करून घेतल्याने ग्राहकांना वीज मीटर बदलणे, तक्रार करण्यासाठी खेटे मारावे लागत आहे. सर्वच विभागात कर्मचाºयांची कमतरता असल्याने कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा ताण पडतो आणि अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषही सहन करावा लागतो.

प्रत्येक विभागास अकरा पदे मंजूर
मेंदडी विभागात सेक्शन इंजिनीअरसह ८ पदे रिक्त
खामगाम विभागात सेक्शन इंजिनीअरसह ८ पदे रिक्त
आंबेत विभागात सेक्शन इंजिनीअरसह ५ पदे रिक्त
म्हसळा ग्रामीण विभागात सेक्शन इंजिनीअरसह ७ पदे रिक्त
म्हसळा शहर विभागात एक असी. इंजिनीअरसह ५ पदे रिक्त
म्हसळा सबडिव्हीजनमध्ये असिस्टंट इंजिनीअरसह विभागीय लेखापाल पदसह ५ पदे रिक्त
वरील सर्व पदे मागील दोन वर्षांपासून रिक्त असल्याने कर्मचाºयांसह नागरिकही हैराण झाले आहेत.

Web Title: Difficulties in resolving electricity consumers complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज