महामार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:32 AM2017-08-19T03:32:33+5:302017-08-19T03:32:36+5:30

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील.

Difficulty due to growing tree on the highway | महामार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अडचण

महामार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अडचण

Next

दासगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील. शासन गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा करीत असला, तरी हा दावा महाड परिसरात फोल ठरताना दिसत आहे. महाडमधून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गालगत दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. यामुळे महामार्गाची साइडपट्टी दिसत आहे. तर दासगाव, वहूर, टोळ, वीर परिसरात साइडपट्टीवरील टाकण्यात आलेली अनावश्यक खडी, दगडे अपघातांना निमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या या प्रश्नाकडे महामार्ग पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
कोकणवासीयांसाठी शिमगा आणि गणेशोत्सव या दोन सणाला अधिक महत्त्व आहे. चाकरमानी जगाच्या कोणत्याही कोपºयात असला, तरी गावातील या दोन सणांसाठी गावाकडे परत येतो. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, आठ ते दहा तासांची वाहतूककोंडी, अपघाताची भीती, आबालवृद्धांना होणारा त्रास, अशी अनेक संकटे पार करत चाकरमानी कोकणात पोहोचतोच. महाड तालुका हद्दीतून सुमारे २५ कि.मी.चा मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गाचा आढावा घेतला असता, मुळातच हा महामार्ग अरुंद आहे. औद्योगिक वसाहत आणि स्थानिक पातळीवरील वाहनांची संख्यादेखील अधिक आहे.
गणेशोत्सवासाठीच्या वाहनांची संख्या या महामार्गावर वाढल्यानंतर वाहतूककोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे इतर भागांप्रमाणे या महामार्ग परिसरात लक्ष घालणे गरजेचे आहे. असे असतानादेखील महामार्गाच्या साइडपट्टीवरील वाहतुकीला अडथळा ठरलेली झाडी-झुडपे अद्याप काढलेली नाहीत. यामुळे या झाडी-झुडपांचा वाहतुकीला त्रास होत आहे. त्याचप्रमाणे या झाडी-झुडपांमुळे साइडपट्टी देखील बेपत्ता झाली आहे. साइडपट्टी दिसून न आल्यामुळे वाहनचालकांना गाड्या थांबविण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे.
>वाहतूक वळवण्याकडे प्रशासनाचा कल
गेली दोन दशके मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. १० वर्षांपूर्वीपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग अरुंद आणि खड्ड्यांनी भरलेला होता, तर नजीकच्या काळात चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पुरती वाट लागली आहे. रस्ता रुंद झाला असला, तरी रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.
पनवेल ते इंदापूरदरम्यान रस्ता शिल्लकच नाही, अशी अवस्था आहे. महाड-पोलादपूर मार्ग कोकणात जाणारा हा मुंबई-गोवा महामार्ग जवळचा असूनदेखील गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवकाळात प्रशासन तळकोकणात जाणारी वाहतूक पुणेमार्गे कराड, चिपळूण-आंबोली घाटमार्ग रत्नागिरी वळवण्याकडे सर्वाधिक कल आहे.
हा मार्ग चांगला असला तरी प्रवास वाढतो आणि घाटदेखील वाढत आहे. महाड-पोलादपूर मार्गे जाणाºया रस्त्यावर सुविधा देण्याऐवजी प्रशासन उत्सवकाळातील वाहतूक घाटमार्गे वळवण्यात मग्न आहे. मात्र, यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी वेळही जास्त लागतो तर वाढलेल्या अंतरामुळे खिशाला चापही बसत आहे.वीर, टोल, दासगाव, वहूर या परिसरांत अनेक ठिकाणी महामार्गाच्या साइडपट्टीवर वाळू उत्खननातून निघालेली टाकाऊ खडी (रेजगा) टाकून देण्यात आला आहे. हा रेजगा कोणत्याही परिस्थितीमध्ये गच्च बसणारा नाही. यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते.
रेजगा टाकलेला खड्डा अगर साइडपट्टी लांबून दिसताना समतल दिसला तरी गाडीचे चाक जेव्हा या ठिकाणी जाते, त्या वेळी हा रेजगा बाजूला होऊन चाक पूर्ण खड्ड्यात जाते. छोटी चारचाकी वाहने अशी परिस्थिती अनियंत्रित होऊ शकतात.
तर दुचाकी वाहन अपघातग्रस्त होण्याची शक्यता पूर्ण असते. यामुळे साइडपट्टीवरून रेजगा हलवणे गरजेचे आहे. अपघाताला निमंत्रण देणाºया या साइडपट्टीवरील रेजग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
>महामार्गालगत गवताचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे साइडपट्टीवर टाकाऊ खडी (रेजगा) पडलेली आहे. गणपती सणासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांच्या वाहनांना अडचण निर्माण होऊ नये. यासाठी हे अडथळे दोन दिवसांत दूर करण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल.
- एस. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक,
वाहतूक शाखा महामार्ग महाड केंद्र

Web Title: Difficulty due to growing tree on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.