रोहा : कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा तसेच काही दुकानांना केंद्र व राज्य शासनाने सवलत दिली आहे. या सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दळणवळणासाठी ई-पास आवश्यक आहे. मात्र, जिल्हा व तहसील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अॅपच्या साहाय्याने ई-पास निघत नसल्याने ई-पासचे घोडे अडलेलेच असून हे ई-पास मिळता मिळेनात, अशी परिस्थिती आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी, तसेच शेतीविषयक सेवा पुरवठादार, शासकीय कामे करणारे ठेकेदार मात्र हवालदिल झाले आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने ई-पास काढण्यासाठी एक लिंक तहसील कार्यालयांना कळविण्यात आली आहे. ई-पास काढण्यासाठी नागरिकांना या लिंकच्या माध्यमातून अर्ज करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यासाठी खास करून तयार करण्यात आलेले अॅप अॅन्ड्रॉइड मोबाइलमध्ये चालेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे अॅप विशिष्ट अॅन्ड्रॉइड मोबाइलमध्येच उघडत असल्याने याचा लाभ अनेकांना घेता येत नाही. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज मान्य होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. याशिवाय ई-पास प्रोसेसिंग सिस्टीम रायगड या नावाचेही एक अॅप जिल्हा प्रशासनाने तयार केले आहे. या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पाससाठी अर्ज करावेत, अशा सूचना तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आल्या आहेत. मात्र, हे अॅपही कार्यान्वित नाही. रायगडात अत्यावश्यक सेवा ई-पासचे घोडे अडलेले असल्याचे चित्र आहे.>प्रक्रियेत सुलभता आणण्याची मागणीअॅपच्या माध्यमातून अर्ज करताना भरावयाची माहिती तसेच स्वत:चा फोटो, ओळखपत्र, कामाच्या ठिकाणचे ओळखपत्र अपलोड करणे शक्य होत नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे. इतर व्यक्तीच्या मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड झाले तर ती व्यक्ती अन्य व्यक्तींचे अर्ज अपलोड करू शकते अथवा नाही, याची शहानिशा होत नाही. सायबर कॅफे तसेच सीएससी सेंटर बंद आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा पास वितरणामध्ये सुलभता आणावी, अशी मागणी होत आहे. रोहा तहसीलदार कार्यालयातून ई-पाससाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सांगण्यात येत आहे. मात्र, अलिबाग कार्यालयातून पास आॅनलाइन अर्ज न करता उपलब्ध होत आहेत.
ई-पास मिळत नसल्याने अडचण, अॅप हाताळताना अडचण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:18 AM