शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाने अडचण; सर्वसामान्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:52 PM2019-09-11T22:52:04+5:302019-09-11T22:52:17+5:30
ग्रामसेवकांच्या संपाचा २० वा दिवस; प्रशासकीय कामे खोळंबली
पेण : तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होणारी विकासकामे खोळंबली असून, आचारसंहितेची घोषणा येत्या दोन-चार दिवसांत कधीही होऊ शकते. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत सांगितलेही आहे. अशा परिस्थितीत शासकीय कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, संगणक परिचालक आदी विभागाचे कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्यांची कामे गेल्या २० दिवसांपासून खोळंबली आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील होणारी विकासकामे निवडणूक आचारसंहितेच्या बडग्यात अडकल्यास नोव्हेंबर महिना उजाडेपर्यंत या कामांना विलंब लागणार आहे, असे एकंदर चित्र दिसत आहे. पेण तालुक्यात ६४ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक २२ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेल्याने २० दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामसेवक अभावी दररोज ग्रामपंचायतीमध्ये खेटे मारावे लागत असून ग्रामसेवकच नसल्याने रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे.
महसूल विभागातसुद्धा तलाठ्यांनी राज्य कर्मचारी संपाला बाहेरून पाठिंबा दिल्याने आपत्कालीन परिस्थितीत कामे वगळता इतर कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. शिक्षकांचीसुद्धा हीच परिस्थिती असून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थिवर्गाला त्यांचे दैनंदिन पाठ शिक विण्यासाठी शिक्षकाअभावी वर्गात विद्यार्थी नुसते बसत आहेत. शिक्षकांचा या संपात सहभाग असल्याने शिक्षण विभागसुद्धा याबाबत काहीच करू शकलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत व महसूल मंडळात ग्रामस्थांची कामे होत नसल्याने या कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वच विभागात कामकाजावर मोठा परिणाम दिसून येत आहे. यामुळे शेतकºयांमध्ये मोठी नाराजी दिसत आहे. गतिमान सरकारची संकल्पना राबविणाºया राज्य शासनाला या कर्मचाºयांच्या संपावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असून जनतेचीच कामे होत नसल्याने सर्वसामान्य जनता कर्मचाºयांच्या संपामुळे कामे ठप्प झाल्याने वैतागली आहे. या संपावर तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या रोषाचा सामना येत्या निवडणुकीत करावा लागणार आहे.