- अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे, परंतु वेळास ते दिघी या सुमारे ७ किमीच्या मार्गाच्या डागडुजीकडे गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरून सतत दिघी पोर्टमधील अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे मार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे.सध्या वेळास ते दिघी मार्गावरून प्रवास करताना चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मात्र ३ किमीचा रस्ता वनखात्याच्या लालफितीमध्ये अडकल्याने मार्गाचे काम अद्याप सुरूच झालेले नाही.वेळास-दिघी रस्त्याची डागडुजी होत नसल्याने हा रस्ता बंद करावा, अशी उपरोधिक मागणी आता स्थानिक करू लागले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टमधून सध्या मालाची वाहतूक सुरू आहे. बंदराकडे जाणाºया माणगाव - साई- म्हसळा- मेंदडी- वडवली- वेळास- कुडगाव- दिघी हा ५५ किलोमीटर लांबीचा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यातील अंदाजे ३० किमीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर काही भागांत कामाला अद्याप कामाला सुरुवातही झालेली नाही.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास - कुडगाव-दिघी या सुमारे ७ किमी मार्गाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या ६ वर्षांपासून नवीन रस्ता होईल, या आशेने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने या रस्याची डागडुजी केली नाही. आता रस्त्यावरील डांबर पूर्णत: निघाले असून, खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मालवाहतूक करणा-या चालकांकडून वेगाने वाहने चालविण्यात येत असल्याने दुचाकी, चारचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते.मुरुड अलिबागकडे जाणाºया पर्यटकांसाठी हा रस्ता सोयीचा असल्याने वर्दळही अधिक असते. त्यामुळे काँक्रिटीकरणास विलंब होणार असेल, तर तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. रस्त्याच्या मागणीसाठी या आधीही अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप रस्ता जैसे थे आहे.३ किमीचा रस्ता वनविभागाकडे वेळास दिघी मार्गावर ३ किमीचा रस्ता राखीव वने भागामध्ये येतो. या मार्गामध्ये रस्ता बांधकामाची आवश्यक परवानगी न आल्याने रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.वेळास दिघी मार्गाचे काँक्रिटीकरण होईपर्यंत तरी रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे व तेही प्रशासनाला जमत नसेल तर हा मार्ग प्रवासासाठी बंद करावा, अशी उपरोधिक संतप्त मागणी जनतेमधून होत आहेवेळास - दिघी वनखात्याच्या अखत्यारित ३ किमीवरील भागाची परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. पुढील १५ दिवसांमध्ये ही परवानगी मिळेल, शिवाय अन्य भागतील परवानगी मिळविणेची प्रक्रिया सुरू आहे व परवानगी मिळाल्यावर कामास सुरुवात होईल. तत्पूर्वी रस्त्याच्या डागडुजीसाठीही निधीची मागणी करणार आहोत.- सचिन निफाडे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
दिघी बंदर रस्ता अडकला वनखात्याच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 3:08 AM