अलिबाग : श्रीवर्धन-म्हसळ््याच्या समुद्र व खाडी क्षेत्रात १९९३ मध्ये आरडीएक्स स्फोटकांची बेकायदा तस्करी झाली. त्यातूनच पुढे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि रायगडच्या सागर किनारपट्टीतील हे दोन तालुके जगाच्या नकाशावर सुरक्षिततेच्या मुद्द्याने सर्वांना ज्ञात झाले. याच पार्श्वभूमीवर ही सागरी किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या हेतूने २६ जानेवारी २००७ रोजी दिघी सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आणि आता तब्बल १० वर्षांनी या पोलीस ठाण्याच्या शिरपेचात जिल्ह्यातील पहिले आयएसओ मानांकित स्मार्ट पोलीस ठाणे असा मानाचा तुरा यंदाच्या स्वातंत्र्य दिनी खोवला जात आहे.दिघी सागरी पोलीस ठाणे स्मार्ट होत असतानाच, या पोलीस ठाण्यात राज्यात प्रथमच पर्यटकांच्या सुरक्षिततेकरिता पहिली ‘टुरिस्ट हेल्पलाइन’ सुरू होत आहे. स्वतंत्र महिला विश्रांती कक्ष,बारनिशी कक्ष, गुन्हे निर्गती कक्ष व गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन देखील यंदाच्या स्वातंत्र्य दिनी होत आहे. दिघी सागरी पोलीस ठाणे आयएसओ मानांकित स्मार्ट पोलीस ठाणे करण्याची संकल्पना रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची आहे. अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील आणि श्रीवर्धन उप विभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ती वास्तवात उतरली असल्याची माहिती दिघी सागरी पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली आहे.
दिघी सागरी पोलीस ठाणे झाले ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 5:53 AM