दिघी बंदर मूलभूत सुविधांपासून वंचित; जेट्टी मोडकळीस आल्याने मच्छीमारांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:17 PM2020-01-13T23:17:42+5:302020-01-13T23:18:26+5:30

मंजूर प्रस्ताव अद्यापही प्रशासकीय मान्यतेच्या वाटेत

Dighi Port deprived of basic facilities; Fishermen suffer due to jet lag | दिघी बंदर मूलभूत सुविधांपासून वंचित; जेट्टी मोडकळीस आल्याने मच्छीमारांना त्रास

दिघी बंदर मूलभूत सुविधांपासून वंचित; जेट्टी मोडकळीस आल्याने मच्छीमारांना त्रास

googlenewsNext

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या विकासासाठी निधी कधी प्राप्त होणार व प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, याचीच प्रतीक्षा दिघीमधील मच्छीमारांना आहे. सद्यस्थितीत अनेक अडचणींना मच्छीमार सुविधांअभावी सामोरे जात आहेत, तर येथील जेट्टीच्या दुरवस्थेमुळे मच्छीमारांना त्रास सहन करावा लागत आहे.

दिघी ऐतिहासिक बंदर आहे. जंजिरा जलदुर्ग ते पूर्वी होणाऱ्या दळणवळणासह लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक यामुळे त्या काळात हे बंदर भरभराटीस आले होते. मोठा व्यापार बंदरातून चालत असे. साधारण १९६० पर्यंत या बंदरातून प्रवासी वाहतूक सुरू होती. आता लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक बंद पडली आहे आणि मच्छीमारी बंदर अशी ओळख या बंदराची बनली आहे. मात्र, येथील औद्योगिकीकरणामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत हे बंदर सापडले आहे. आता मच्छीमारी बंदर अशी या बंदराची ओळख असली, तरी मच्छीमारी बोटींसाठी या बंदरात असलेली जेट्टी शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे जेट्टीअभावी समुद्रकिनारी मासळी उतरविताना व बोटीत डिझेल, बर्फ चढविताना मच्छीमारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मासळी तर पाण्यातील दगडावर उतरविली जाते. गेली अनेक वर्षे मच्छीमारी बोटींसाठी जेट्टी बांधावी, अशी मागणी येथील मच्छीमार करीत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात येत आहेत. दिघी येथील मोडक्या स्थितीतील जेट्टीमुळे समुद्रातून आणलेल्या मच्छीला उतरवायला जागा मिळत नाही. उशीर झाला, तर मच्छी खराब होऊन अतिशय कमी भावात विकावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिघी येथील रहिवासी मंगेश गुणाजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बंदरातील समस्यांकडे कोणीच लक्ष देत नाही.

दिघी बंदराला असणारी जुनी जेट्टी दिवसेंदिवस ढासळत आहे. पावसाळ्यातील उधाणाने त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात लाटांच्या तडाख्यामुळे ती आणखी उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. अर्धी अधिक जेट्टी तुटल्यामुळे समुद्राच्या उधाणाच्या लाटा बंदरात घुसण्याची भीती मच्छीमारांना आहे. त्यामुळे लाटांचे पाणी घुसून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बंदराचा विकास थांबला असून, मच्छीमारांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

बंदरातून २०० मच्छीमारी नौका ये-जा करतात. एकच तुटलेली जेट्टी असल्यामुळे एकाच वेळी एक किंवा दोन नौका धड लागत नाहीत. मच्छीमारांना जेट्टीवर विविध सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरच त्यांना बंदराचा फायदा होणार आहे. मात्र, अद्याप जेट्टीविषयी हालचाली झाल्या नाहीत. - बाळाराम खेळोजी, अध्यक्ष, कोळी समाज, दिघी

दिघी येथे प्रलंबित मासेमारी जेट्टीसाठी गती मिळावी. सध्या आम्हा कोळी लोकांना जेट्टीच्या दुरवस्थेमुळे मासेमारी व्यवसायात त्रास होत आहे. - गोविंद गुणाजी, माजी सरपंच दिघी.



सुविधायुक्त मासेमारी बंदर नसल्याने अडचण
1. कोकण किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला, तरी सुविधायुक्त मासेमारी बंदरांची मात्र, कोकणात कमी आहे. रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.
2. पण संपूर्ण जिल्ह्यात एकही सुसज्ज मासेमारी बंदर उपलब्ध नाही व त्यामुळे श्रीवर्धन मुरुडपासूनच्या मच्छीमारांना मासेविक्रीसाठी मुंबईतील बंदरापर्यंतचा प्रवास करावा लागतो आहे. याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे. मासे उतरविण्यासाठीचे लँडिंग पॉइंट, मत्स्यप्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या बंदरामुळे रायगड जिल्ह्यातून मासे निर्यातीलाही प्रोत्साहन मिळू शकणार आहे.
3. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मागणी असताना दिघी बंदराच्या विकासाच्या दृष्टीने तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. अनेक नेत्यांच्या पाठपुराव्याने दिघी कोळीवासीयांसाठी नवीन जेट्टी मंजूर झाली.
4. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासेमारी जेट्टीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले. तेथून ते सर्वे, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता होऊन मंजुरी मिळेल, असे मत्स्यआयुक्तालय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: Dighi Port deprived of basic facilities; Fishermen suffer due to jet lag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड