दिघी पोर्ट कामगारांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:45 PM2018-11-22T23:45:35+5:302018-11-22T23:45:38+5:30
दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे.
बोर्ली पंचतन : दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे. याविरोधात कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
दिघी पोर्टमध्ये एकूण १३० स्थानिक कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळी बोनस १४ नोव्हेंबरपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५५ कामगारांना फरकबिल आणि बोनस देण्यात आला. या संदर्भात दिघी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तायडे यांच्याकडे कामगारांनी विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दिघी पोर्ट मुख्य कार्यालय मुंबई येथील संपर्क साधला असता, जे कर्मचारी भारतीय कामगार सेनामध्ये सभासद आहेत, त्यांना बोनस आणि फरकबिल देण्यात आले असून उर्वरित ७५ कामगारांना बोनस वा फरकबिल जमा झाले नसल्याने कामगारांना सांगण्यात आल्याने त्यांची घोर निराशाच झाली आहे.
कामगारांचे पगार उशिराने देणे तसेच पगारवाढीचा फरक थकवून ठेवणे यासाठी २१ ते २४ मे २०१८ या चार दिवसांमध्ये कामगारांनी पोर्टचे काम पूर्णपणे बंद ठेवले होते. यावर दिघी पोर्ट व्यवस्थापनाने काही थकित रक्कम कामगारांच्या अकाउंटमध्ये २५ मे रोजी जमा केले आणि उर्वरित ५0 टक्के फरकाची रक्कम गणपतीत जमा होईल, असे आश्वासन दिले.
व्यवस्थापनाचा निषेध
गणपती, दिवाळी झाली तरी फरकाची रक्कम दिघी पोर्ट प्रशासनाने अदा केलेली नाही. अखेर कामगारांनी एकजुटीने दिघी पोर्टच्या विरोधात दंड थोपटले आहेत. फरकबिल व सानुग्रह अनुदान मिळाल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.